मदत नव्हे कर्तव्य! नीट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गरजू विद्यार्थ्यांना शिवसेनेने दिला मदतीचा हात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या सगळ्या तरुणांसाठी नीटची NEET परीक्षा ही अत्यंत महत्वाची असते. धाराशिव तालुक्यातील 4 प्रतिभावंत विद्यार्थ्यांनी अपार मेहनत घेत ही परीक्षा उत्तीर्ण केली. या चारही विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती ही बेताची आहे. तरीही या चार विद्यार्थ्यांनी जिद्दीने शिकत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे या चौघांना वैद्यकीय शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी शिवसेना पुढे आली आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा मार्ग दाखवला होता. आजही शिवसैनिक याच वाटेवरून पुढे जात असून मदत नव्हे कर्तव्य या भावनेने शिवसेनेने या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

बारावीनंतर नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी बहुतांश विद्यार्थ्यांना क्लासची गरज भासते. या क्लासच्या फी या भरमसाठ असतात. हे शिक्षण सधन लोकांनाही जड जातं. जर सधन लोकांची ही परिस्थिती असेल तर मग हातावर पोट असणाऱ्यांना आपल्या मुलांना हे शिक्षण देणं काय परवडणार? उदाहरण द्यायचं झालं तर कळंब तालुक्यातील शिराढोण येथील नंदकुमार प्रजापती यांचे देता येईल. प्रजापती हे भेळ विक्रेते आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांना भेळ विक्री करता आली नाही, ज्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती फार खालावली होती. याही परिस्थितीत त्यांचा मुलगा संजयकुमार याने नीट परीक्षेत 720 पैकी 655 गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले.संजयकुमार हा शासकीय कोट्यातून वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरला असून त्याला मुंबई येथील ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे.

कळंब तालुक्यातल्याच बोरगाव येथील आकांक्षा ही एका शेतकऱ्याची मुलगी आहे. तिने नीट परीक्षेत 550 गुण मिळवले असून तिला लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. घरची परिस्थिती बिकट असल्याने तिला पुढील खर्च परवडणारा नाही. तिच्या वडिलांकडे फक्त एक एकर कोरडवाहून शेती आहे. त्यातून येणारे उत्पन्न पुरत नसल्याने ते खवाभट्टीही चालवतात. मात्र मुलीच्या शिक्षणासाठी लागणारा अवाढव्य खर्च त्यांना पेलवणारा नाही.

धाराशिव तालुक्यातील खानापूरमधल्या समर्थ राजेंद्र पाटील याने नीट परीक्षेत 625 गुण मिळविले आहेत. त्याला पुण्याच्या बीजेएमसी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशही मिळाला आहे. समर्थचे वडील एका दुकानात कामाला असून घरात ते एकटे कमावणारे आहेत. समर्थने नीट परीक्षा उत्तीर्ण केल्याचा त्यांना आनंद झाला, मात्र त्याच्या पुढील शिक्षणासाठी येणारा खर्च कसा भागवायचा हा त्यांना प्रश्न पडला होता.

धाराशिव नितळी येथील अंकिता बालाजी कुंभार हिच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले आहे. तिने परिस्थितीचा बाऊ न करता प्रचंड मेहनतीच्या जोरावर लातूर येथील महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवला. मात्र पुढील खर्चाचा घोर तिलाही लागला होता. या चारही जणांची अडचण शिवसेनेने ओळखली आणि त्यांना आधार देण्याचं काम केलं.

पुढील शिक्षणासाठीच्या खर्चाची तिला व तिच्या कुटुंबियांना चिंता लागली होती. ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेच्या वतीने आकांक्षाला वैद्यकीय शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली. शिवसेनेने या चौघाही जणांचा आर्थिक भार हलका केला असून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे – पाटील, शिवसेना धाराशिव तालुकाप्रमुख सतीश सोमाणी यांनी या चारही विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीची राशी त्यांच्या हातात सुपूर्द केली. यावेळी उपजिल्हायुवाअधिकारी सागर बाराते हे देखील उपस्थित होते