NEET: मोदी सरकार कुणाचं संरक्षण करत आहे? तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरिका घोष यांचा खरमरीत सवाल

NEET च्या परीक्षेवरून देशभरात प्रचंड वादळ उठलं आहे. संतप्त विद्यार्थी आणि त्यांच्या संघटना रस्त्यावर उतरून NDA सरकारचा निषेध करत आहे. विरोधी पक्षांनी हा प्रश्न उचलून धरत सरकारला चांगलंच घेरलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सागरिका घोष यांनी व्हिडीओ पोस्ट करत तिखट सवाल केले आहेत.

 

शिक्षणमंत्र्यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) कामकाजाची तपासणी करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल असं म्हटलं आहे. त्यांची ही कृती पुरेशी नसल्याचं सागरिका घोष यांनी म्हटलं आहे.

 

‘शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले आहे की नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) कामकाजाची तपासणी करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल. हे पुरेसे नाही. या पेपर लीकसाठी कोण जबाबदार आहे? या सर्व गोष्टी रोखण्यासाठी सरकार उपाय का शोधत नाही? मोदी सरकार कुणाचं संरक्षण करत आहे?’, असे खरमरीत सवाल सागरिका घोष यांनी केले आहेत.

गेल्या 7 वर्षात स्पर्धा परीक्षांचे 70 हून अधिक पेपर फुटले आहेत, असा आरोप करतानाच त्यांनी पंतप्रधान मोदी आणि सरकारवर निशाणा साधला आहे. जनतेच्या पैशावर मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ हा इव्हेंट करतात मात्र त्यांच्याकडे स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्याची पात्रता नाही. ते पूर्णपणे अयशस्वी ठरले आहेत. ही अत्यंत शरमेची बाब आहे. त्यांनी देशातील विद्यार्थ्यांना फसवलं आहे, असा आरोप त्यांनी केला.