कोल्हपुरात नवजात बाळ आणि मातेला व्हाईट आर्मीने कोरोना विळख्यातुन काढले बाहेर

698

नवजात बाळ आणि मातेला कोरोनाच्या विळख्यातुन व्हाईट आर्मी आणि मेडिकल असोसिएशनच्या कोविड सेंटरने बाहेर काढले. गेल्या दोन दिवसांपूर्वीच 103 वयाच्या आज्जीलाही या कोविडसेंटरमधुन ठणठणीत बरे करुन घरी पाठविण्यात आले.

अमृता गुरव हि तीन महिन्यांपूर्वी प्रयाग चिखली,ता.करवीर येथे माहेरी बाळंतपणासाठी आली होती. एका नामांकित प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरकडे तिच्यावर गरोदरपणात उपचार सुरू होते. पण दिवस भरल्यानंतर 3 सप्टेंबर रोजी तिच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. स्वॅब घेतल्याशिवाय तिला दाखल करून घेण्यास डॉक्टर तयार झाले नाहीत. अशातच तिचा स्वॅबचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टर ने या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करून घ्यायला नकार दिला. घरच्या लोकांची तारांबळ उडाली. पण जवळच्याच एका डॉक्टरांनी कर्तव्य भावनेने त्या महिलेची यशस्वी प्रसुती केली. पण कोरोना पॉझिटिव्ह असल्याने माहेरच्या लोकांची काळजी वाढली होती. अशात तिच्या नातेवाईकांकडुन अडचण समजताच व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांनी क्षणाचाही विलंब न करता या मातेला तत्काळ व्हाईट आर्मीच्या दसरा चौक येथील जैन बोर्डिंग मधील कोविड केअर सेंटर मध्ये दाखल केले. बाळाची काळजी घ्यायला तिची जुनी जाणकार आजी सुद्धा याच कोविड सेंटरमध्ये राहिली. अमृताला मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.आबाजी शिर्के आणि त्यांचे सहायक डॉ.अमोल कोडोलीकर या दोघांच्या देखरेखीखाली तब्बल बारा दिवस उपचार करण्यात आले. या काळात व्हाईट आर्मीच्या नर्स हिना यादवाड यांनी तर दिवसरात्र एक करून अमृताला काय हवंय काय नको याची काळजी घेतली. तिची मनापासून सुश्रूषा केली. सोबतीला व्हाईट आर्मीचे कोरोना योद्धे जवान होतेच. आता 13 दिवसांनी अमृताच्या सर्व घेण्यात आलेल्या चाचण्या पूर्णपणे निगेटिव्ह आल्या.त्यामुळे अमृता आपल्या नवजात कन्येसह माहेरी चालली आहे.

दोन दिवसांपूर्वीच 103 वयाच्या आज्जीला ठणठणीत बरे करुन,तिचा वाढदिवस साजरा करुनच घरी पाठविण्यात आले. आता व्हाईट आर्मीच्या वतीने या नवजात कन्येच्या नामकरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. अशोक रोकडे आजोबा आणि या कन्येचे सगळे व्हाईट आर्मीचे जवान मामा आणि नर्सिंगस्टाफ मधील आत्या सुद्धा या नामकरण समारंभात सहभागी होणार आहेत. उद्या सकाळी व्हाईट आर्मीच्या कोविड केअर सेंटर मधून जितक्या महिला कोरोना मुक्त होवून गेल्या आहेत त्या सर्व पुन्हा या कोविड सेंटर मध्ये कार्यक्रमाला हजर राहणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या