
ब्रिटिश राजवटीपासून हिंदुस्थानी लष्करी जवानांना दुधाचा पुरवठा करणारे देशातील सुमारे 130 मिलिटरी मिल्क फार्म्स आता हिंदुस्थानी लष्कराने पूर्ण बंद केले आहेत. 132 वर्षे या फार्म्सनी अगदी युद्धकाळातही थेट सीमेपर्यंत जवानांना दुधाचा पुरवठा करण्याचे कार्य केले आहे. नवी दिल्ली छावणीतील एका भावपूर्ण कार्यक्रमात जवानांची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या मिल्क फार्म्सना निरोप देण्यात आला. ब्रिटिशांनी 1 फेब्रुवारी 1889 ला देशातील पहिला मिलिटरी मिल्क फार्म अलाहाबाद येथे बनवला. त्यानंतर देशभरात दिल्ली, जबलपूर, रानीखेत, जम्मू, श्रीनगर, लेह, कारगील, झाशी, गुवाहाटी, सिकंदराबाद, लखनौ, मीरत, कानपूर, महू, दिमापूर, पठाणकोट, ग्वाल्हेर, जोरहाट, पानागढसह एपूण 130 स्थानांवर असे मिलिट्री फार्म्स उघडण्यात आले. 1990 च्या दशकात कारगील आणि लेह येथे असे फार्म्स उघडण्यात आले होते. या फार्म्समधून लष्कराला वर्षाला 3.5 कोटी लिटर दूध आणि 25 हजार मेट्रिक टन चारा पुरवला जायचा, पण आता या फार्म्सवर वर्षाला होणार 280 कोटी रुपयांचा खर्च वाचवण्यासाठी ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
























































