
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
राजधानी दिल्ली येथील गाझीपूर भागात असलेला कचर्याचा ढीग दिवसेंदिवस वाढतोच आहे. त्यामुळे 2020 पर्यंत हा ढीग ताजमहालाहून उंच होईल असे म्हटले जात आहे. जगातील सर्वात प्रदूषित आणि गलिच्छ राजधानी म्हणून आपल्या दिल्लीचे नाव संयुक्त राष्ट्राने घेतले आहे. आता गाझीपूरचा कचरा ढीग त्याचेच प्रतीक ठरेल तर नवल नाही.
फुटबॉलची 40 मैदाने एकत्र केल्यावर जेवढी जागा होईल तेवढी मोठी जागा या कचर्याच्या ढिगाने व्यापली आहे. दरवर्षी या ढिगार्यात किमान 10 मीटरची भरच पडत आहे. दिल्लीचे सुपरींटेंडेंट इंजिनीयर अरुणकुमार यांनी याबाबत बोलताना सांगितले की, कचर्याचा हा ढीग आताच 65 मीटर (231 फूट) इतका उंच आहे. हाच वेग कायम राहिला तर येत्या 2020पर्यंत या ढिगाची उंची 73 मीटर उंच ताजमहालापेक्षाही उंच होऊ शकते.


























































