
कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. हिंदुस्थानी हवाई प्राधिकरणाने देशातील सात विमानतळांच्या धावपट्टय़ांना मार्च 2022 पर्यंत अद्ययावत करून त्यांची लांबी वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यात कोल्हापूरसह जम्मू-कश्मीर, मध्य प्रदेश (जबलपूर), मेघालय (बारापानी), आंध्र प्रदेश (तिरुपती व काडापा) तसेच तामिळनाडू (तुतीकोरीन) आदी विमानतळांचा समावेश असल्याचे विमानतळ प्राधिकरणाने म्हटले आहे.
कोल्हापूर येथील विमानतळाच्या धावपट्टीची लांबी 1370 मीटर असून ती 2300 मीटरपर्यंत वाढविण्याचे सुरू झाले असून यंदाच्या डिसेंबरपर्यंत ते पूर्ण करण्याची योजन असल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. विमानतळाची रचना विशेष प्रकाराच्या विमानांचा आकार तसेच विमानांचे ट्रफिक आणि इतर बाबींचा विचार करून केलेली असते. जेव्हा एअर ट्रफिक वाढून विमानांची संख्या वाढते तेव्हा एअरलाईन कंपन्यांना मोठी विमाने त्या विमानतळावरून सुरू करायची असतात. याच कारणांसाठी विमानांच्या धावपट्टय़ांची लांबी वाढविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे कोल्हापुरात मोठी विमाने उतरविणे शक्य होणार असल्याचे म्हटले जात आहे.
देशातील सात विमानतळांच्या धावपट्टय़ांचा विकास
जम्मू येथील विमानतळाची धावपट्टी 2042 मीटरवरून 2438 मीटर इतकी वाढविण्यात येणार असून नव्या वर्षांत मार्चपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. तिरुपतीच्या धावपट्टीची लांबी डिसेंबर 2021 पर्यंत 2286 मीटरवरून 3810 मीटर्स इतकी करण्यात येईल. जबलपूर आणि तुतीकोरीन विमानतळांच्या धावपट्टीचे काम अनुक्रमे डिसेंबर 2021 आणि मार्च 2022 पर्यंत पूर्ण होईल. बारापानी विमानतळाची धावपट्टी वाढविण्याचे काम यंदाच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. काडापाच्या धावपट्टीचे काम मार्च 2021 पर्यंत पूर्ण होईल असेही अधिकाऱयांनी शेवटी सांगितले.



























































