
नाशिक जिल्ह्यात चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नाशिक येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्न 430 खाटांचे रूग्णालय सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक संलग्नित या महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमासाठीच्या पायाभूत सुविधांच्या आधारावर पदव्युत्तर पदवी संस्था स्थापन करण्यास तसेच त्यामध्ये 15 विषयांमध्ये एकूण 64 पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन जागा निर्माण करण्यासदेखील मान्यता देण्यात आली.
627 कोटी खर्च अपेक्षित
महाविद्यालयासाठी आवश्यक जागा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परिसरामध्ये उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयासाठी सुमारे 627 कोटी 62 लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.




























































