परळचा नवा प्लॅटफॉर्म १० जूनला खुला होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेने जोमाने कार्य हाती घेतलेल्या परळ टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. येत्या १० जूनपासून परळचा नवा प्लॅटफॉर्म प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रचंड गर्दी असणाऱया या स्थानकातील प्रवाशांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.

गेल्या वर्षी २९ सप्टेंबर रोजी एल्फिन्स्टन रोड स्थानकात चेंगराचेंगरी होऊन २३ प्रवाशांचा बळी गेला होता. त्याच वेळी रखडलेल्या परळ टर्मिनससह १२ मीटर रुंदीच्या नव्या पादचारी पुलाचे टेंडर काढण्यात आले होते. एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर करी रोड, आंबिवली आणि एल्फिन्स्टन रोड येथे आर्मीच्या वतीने पादचारी पूल उभारण्याची घोषणा होऊन त्याची पूर्तता करण्यात आली. त्याच वेळी परळ टर्मिनस उभारण्याचे कामही वेगाने सुरू करण्यात आले. आता परळचा प्लॅटफॉर्म क्र. १ च्या बाजूला नवा प्लॅटफॉर्म तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या प्लॅटफॉर्मवर रंगरंगोटीचे काम सुरू असून शेवटचा हात फिरविला जात आहे. येथे आता कल्याण दिशेकडे जाणाऱया लोकलना येत्या १० जूनपासून थांबा देण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी दिली आहे. या नव्या फलाटाची लांबी १५ डब्यांची करण्यात आली असून त्यावर सध्या १२ मीटर रुंदीच्या नव्या पादचारी पुलाला पूर्व ते पश्चिम जोडण्यात आले आहे, परंतु ज्यांना पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्थानकाकडे जायचे असेल त्यांच्यासाठी नव्या प्लॅटफॉर्मवरून जाण्यासाठी मार्ग नसल्याने जुन्या प्लॅटफॉर्म क्र. १ वरून लोखंडी जाळय़ांचा रस्ता तयार करण्यात येणार असल्याची माहिती शर्मा यांनी दिली.

परळ लोकल सुरू होण्यास अजून वेळ लागणार
परळ टर्मिनस ज्या कामासाठी तयार करण्यात आले आहे ती परळ लोकल सुरू करण्यासाठी टर्मिनस प्लॅटफॉर्म तयार करावा लागणार आहे. तसेच लोकलचे संचालन करण्यात येणारी ‘रूट रिले इंटरलॉकिंग’ यंत्रणा उभारण्यासाठीदेखील अद्यापि काही महिने लागणार आहेत. त्यानंतरच परळ लोकल सुरू करणे शक्य होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.