
सामना प्रतिनिधी । मुंबई
एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेने जोमाने कार्य हाती घेतलेल्या परळच्या नव्या फलाटाचे काम अखेर पूर्ण झाले. रविवारी विशेष मेगाब्लॉक घेऊन हे काम पूर्ण करण्यात आले आणि नवीन फलाटावरून सायंकाळी ६.२९ वाजता कल्याणच्या दिशेने पहिली लोकल रवाना झाली. फलाट क्र. १ च्या बाजूला नवा फलाट तयार करण्यात आल्याने आता कल्याणला जाणाऱ्या लोकल या नव्या फलाटावर थांबणार आहेत. नवीन आणि जुन्या फलाटाला जोडण्यासाठी तीन ठिकाणी विशेष रॅम्प बनवण्यात आले आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी दिली आहे.
A new platform has been added to the suburban network of Mumbai. Central Railway is committed to provide the best possible to Mumbaikars. Thank you all for all the support during the block period. Such blocks are essential for infrastructure upgrade and commuter convenience… pic.twitter.com/XmW0QrrSNc
— Central Railway (@Central_Railway) June 17, 2018
गेल्या वर्षी २९ सप्टेंबर रोजी एल्फिन्स्टन रोड स्थानकात चेंगराचेंगरी होऊन २३ प्रवाशांचा बळी गेला होता. त्याच वेळी रखडलेल्या परळ टर्मिनससह १२ मीटर रुंदीच्या नव्या पादचारी पुलाचे टेंडर काढण्यात आले होते. एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर करी रोड, आंबिवली आणि एल्फिन्स्टन रोड येथे आर्मीच्या वतीने पादचारी पूल उभारण्याची घोषणा होऊन त्याची पूर्तता करण्यात आली. त्याच वेळी परळ टर्मिनस उभारण्याचे कामही वेगाने सुरू करण्यात आले होते. परळचा फलाट क्र. १ च्या बाजूला नवा फलाट तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून नव्या फलाटावरून कल्याणसाठी रविवारी पहिली लोकल रवाना झाली.
नव्या फलाटाची लांबी १५ डब्यांची करण्यात आली असून त्यावर सध्या १२ मीटर रुंदीच्या नव्या पादचारी पुलाला पूर्व ते पश्चिम जोडण्यात आले आहे. एल्फिन्स्टन-परळ पुलावरून दैनंदिन प्रवासी संख्या सुमारे साडेतीन लाख आहे. परळ टर्मिनस झाल्यानंतर प्रवाशांना अत्यंत सोयीचा हा मार्ग होईल.
परळ लोकल सुरू होण्यास अजून वेळ लागणार
परळ टर्मिनस ज्या कामासाठी तयार करण्यात आले आहे ती परळ लोकल सुरू करण्यासाठी टर्मिनस फलाट तयार करावा लागणार आहे. तसेच लोकलचे संचालन करण्यात येणारी ‘रूट रिले इंटरलॉकिंग’ यंत्रणा उभारण्यासाठीदेखील अद्यापि काही महिने लागणार आहेत. त्यानंतरच परळ लोकल सुरू करणे शक्य होणार आहे. परळ टर्मिनस पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर दादर टर्मिनसवरील भार हलका होणार आहे.



























































