बेस्टचे मुंबईत तीन नवे एसी बसमार्ग; दुसऱ्या दिवशीही प्रवासीवाढ

36

सामना ऑनलाईन । मुंबई

बेस्टने दरकपात केल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढतच असून पहिल्या दिवशी पाच लाख 2 हजार 813 ने वाढलेली प्रवासीसंख्या दुसऱ्या दिवशी 5 लाख 62 हजार इतकी वाढली आहे. तसेच सध्या एमएमआरडीएच्या मदतीने बीकेसीमध्ये सुरू असलेल्या एसी बसेसना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने मुंबईतही धारावी आगार ते चर्चगेट आणि चर्चगेट ते वर्ल्ड ट्रेड सेंटर, कॉम्रेड प. कृ.कुरणे चौक ते प्लाझा सिनेमा अशा तीन मार्गांवर बेस्टने हायब्रीड एसी बससेवा सुरू केली आहे.

बेस्ट प्रशासनाने 9 जुलैपासून साध्या बससेवेचे किमान तिकीट पाच रुपये तर एसी बससेवेचे तिकीट सहा रुपये केल्याने प्रवाशांचा पुन्हा बेस्टकडे ओढा वाढत आहे. एकेकाळी रेल्वेनंतर 40 लाख प्रवाशांची रोजची वाहतूक करणारी बेस्ट सध्या 20 लाखांवर आली आहे. परंतु बेस्टने तिकीट दर कमी केल्याने प्रवाशांचा ओघ बेस्टकडे पुन्हा वाढत आहे. तिकीट दरकपातीआधी 17 लाख असलेली तिकीट विक्री नवे दर लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी 9 जुलै रोजी 22 लाखांवर गेली. आता 10 जुलै रोजी दुसऱ्या दिवशी तिकीट विक्री 22 लाख 80 हजार 317 वर गेली आहे. त्यामुळे प्रवासीसंख्या 5 लाख 65 हजारांवर गेली आहे तर दरकपातीआधी 2 कोटी 12 लाख 33 हजार 260 रुपये असलेले उत्पन्न नवे दर लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी 1 कोटी 45 लाख 34 हजार 697 रुपये इतके कमी म्हणजे 66 लाख 98 हजार 563 ने घटले होते ते दुसऱ्या दिशी 10 जुलै रोजी 1 कोटी 48 लाख 43 हजार 174 इतके झाल्याने उत्पन्नात मात्र किंचित वाढ झाली आहे.

मुंबईतल्या नव्या तीन एसी बससेवा

बेस्टने आपल्या ताफ्यातील किंग लाँग वातानुकूलित बस तांत्रिक बिघाडामुळे चार वर्षांपूर्वी बंद केल्यानंतर सध्या केवळ बीकेसीमध्ये एमएमआरडीएच्या मदतीने हायब्रीड एसी बससेवा सुरू आहे. बेस्ट बसची दरकपात झाल्याने या एसी बसेसना तुफान प्रतिसाद मिळत असल्याने बेस्टने 11 जुलैपासून दर वीस मिनिटांना एक फेरी अशा एएस-1 ः सीएसएमटी ते एनसीपीए, एएस-8 ः वर्ल्ड ट्रेड सेंटर ते चर्चगेट स्टेशन या दोन एसी सेवा सुरू केल्या आहेत. आणि 10 जुलैपासून एएस-172 ः कॉम्रेड प. कृ. कुरणे चौक ते प्लाझा सिनेमा ही तिसरी अशा एकूण तीन नव्या एसी फेऱ्या सुरू केल्याने मुंबईकरांना किमान सहा रुपये तिकिटात गारेगार प्रवास करता येणार आहे.

  •                                                 उत्पन्न                तिकीट विक्री
  •     दरकपातीपूर्वी 8 जुलै                 2,12,33,260        17,15,440
  •     9 जुलै 2019                        1,45,34,697         22,18,253
  •     10 जुलै 2019                      1,48,43,174         22,80,317
आपली प्रतिक्रिया द्या