न्यूझीलंडचा श्रीलंकेवर विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । माऊंट मौंगानुई

न्यूझीलंडने धावांचा पाऊस पडलेल्या सलामीच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पाहुण्या श्रीलंकेवर 45 धावांनी विजय मिळविला. न्यूझीलंडकडून मार्टीन गप्टीलने 138 धावांची खेळी केली, तर श्रीलंकेकडून कुसल परेराने 102 धावांची वादळी खेळी करुन जोरदार प्रतिकार केला. मात्र, जेम्स नीशमने थिसारा परेराच्या 49व्या षटकांत 5 षटकारांसह 34 धावांची केलेली लयलूट या सामन्यात निर्णायक ठरली. सामनावीराची माळ मार्टीन गप्टीलच्या गळ्यात पडली. याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.

न्यूझीलंडकडून मिळालेल्या 372 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला 49 षटकांत 326 धावांपर्यंत मजल मारता आली. श्रीलंकेकडून निरोशान डिक्वेला (76), दानुष्का गुणथिलका (43) व कुसल परेरा (102) यांनी उपयुक्त फलंदाजी केली. न्यूझीलंडकडून जेम्स नीशमने 3 बळी मिळवले.

त्याआधी, नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने 7 बाद 371 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. यात मार्टीन गप्टीलने 139 चेंडूत 11 चौकार व 5 षटकारांसह 138 धावांची खेळी केली. कर्णधार केन विल्यम्सन (76) व रॉस टेलर (54) यांनीही अर्धशतके झळकाविली. त्यानंतर जेम्स नीशमने तळाला टॉप गीअरमध्ये फलंदाजी करताना 13 चेंडूत नाबाद 47 धावांची खेळी करताना 6 टोलेजंग षटकार लगावले.