उरण नगर पालिकेच्या व पोलीस ठाण्याच्या इमारतींना ताडपत्रीचा आधार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

उरण शहरातील नागरीकांच्या समस्यांचे निवारण करणार्‍या उरण नगर पालिकेच्या व उरण पोलीस ठाण्याच्या इमारतींना पावसाळ्यात गळती लागली आहे. त्यामुळे या कार्यालयात कामकाज करणारे अधिकारी व कर्मचारी तसेच शासकीय कागद पत्रके छतातून पडणार्‍या पावसाच्या पाण्यात भिजून जाऊ नयेत यासाठी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी वर्गाने चक्क इमारतींना ताडपत्रीच्या छताचे आच्छादन दिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

 जनतेच्या समस्याचे निवारण करणारे शासकीय कार्यालय हे नीट नेटक्या, सुसज्ज इमारतीत असावे असे त्या त्या कार्यालयात कामकाज करणार्‍या अधिकारी व कर्मचारी वर्गा बरोबर कामकाजासाठी ये-जा करणार्‍या नागरीकांना वाटत असते. परंतू शासनाच्या उदासीन धोरणामुळे आज कित्येक कार्यालयाच्या इमारतीची अवस्था हि बिकट झालेली आहे. उरण तालुक्यातील नगर पालिकेच्या व उरण पोलीस ठाण्याच्या इमारतींच्या छतांची पडझड ही मागील दोन – चार वर्षा पासून झाली आहे. त्यामूळे पावसाळ्यात या इमारतीच्या छतामधून पावसाचे पाणी हे कार्यालयात कामकाज करणार्‍या अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्या अंगावर पडत असून कार्यालयातील शासकीय कागदपत्रके ही भिजत आहेत.

छतातून झिरपणार्‍या पावसाच्या पाण्यातून सुटका करून घेण्यासाठी यावर्षीच्या पावसाळ्यात उरण नगर पालिकेच्या व उरण पोलीस ठाण्याच्या अधिकारी वर्गाने यावर उपाययोजना म्हणून सध्या या दोन्ही कार्यालयाच्या (इमारतीच्या) छतावर ताडपत्रीच्या छत्रीचा आधार दिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तरी उरण नगर पालिकेच्या अधिकार्‍यांनी रेंगाळत पडलेल्या उरण नगर पालिकेच्या नव्या इमारतीच्या कामाला गती द्यावी तसेच उरण पोलीस ठाण्याला सुसज्ज इमारत उभी करून देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी उरणचे सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील यांनी केली आहे.