पुण्यात नायजेरीयन व्यक्तीकडून सव्वादोन कोटींचे कोकेन जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यातील उंड्री भागात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक एकने नायजेरीयन तरुणाकडून तब्बल सव्वा दोन कोटींचे कोकेन जप्त केले आहे. उंड्री येथे कोकेन विक्रीसाठी आला असता आरोपीला ताब्यात घेण्यात आले. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली ही आजवरची सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे.

फॉलरीन अब्दुलअझीज अन्डोई (50, रा. उंड्री. मूळ. रा. नायजेरीया) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शहरात अंमली पदार्थ तस्करीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पथकाकडून गस्त घालण्यात येत आहे. याबाबतच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड यांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. या दरम्यान एक संशयित नायजेरीयन उंड्री मंतरवाडी रस्ता परिसरात कोकेन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. यानुसार सापळा रचून अन्डोई याला कारसह ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता कारमध्ये तब्बल 1 किलो 81 ग्रॅम कोकेन आढळून आले. त्याची बाजारात 2 कोटी 16 लाख 20 हजार एवढी किंमत आहे. त्याच्या ताब्यातून कोकेन, मोबाईल, कार असा तब्बल 2 कोटी 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अ‍ॅन्डोई हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच कस्टम विभागाने त्याला एकदा अटक केली होती. नुकताच तो जामिनावर बाहेर आला असून त्याने पुन्हा अंमली पदार्थाची तस्करी सुरू केली होती. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक शैलजा जाणकर, लक्ष्मण ढेंगळे, अंमलदार प्रविण उत्तेकर, पांडुरंग पवार, मनोजकुमार साळुंके, विशाल दळवी, संदीप शिर्के, सुजित वाडेकर, राहुल जोशी, विशाल शिंदे, सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेख, योगेश मोहीते यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

सर्वात मोठी कारवाई
उंड्री भागात नायजेरीयन व्यक्तीकडे कोकेनचा साठा असल्याचे समजल्यानंतर पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सव्वादोन कोटींचे कोकेन जप्त केले आहे. गेल्या काही कालावधीतील सर्वात मोठी ही कारवाई आहे.
– रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा