मध्य रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या सुधारित वेळापत्रकानुसार रात्रीच्या कसारा, कर्जत लोकल नियमित वेळेपूर्वी 6 ते 12 मिनिटे आधीच सोडण्यात येणार आहेत. परिणामी, शनिवारपासून शेवटची कसारा, कर्जत लोकल पकडण्यासाठी प्रवाशांना धावपळ करावी लागणार आहे.
सीएसएमटी-कसारा लोकल दररोज रात्री 12.14 वाजता, तर सीएसएमटी-कर्जत लोकल दररोज रात्री 12.24 वाजता सुटते. मात्र 5 ऑक्टोबरपासून सीएसएमटी-कसारा लोकल रात्री 12.08 वाजता तर सीएसएमटी-कर्जत लोकल रात्री 12.12 वाजता सोडण्यात येणार आहे.
म्हणजेच या लोकल अनुक्रमे 6 आणि 12 मिनिटे आधीच सुटणार आहेत. त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कसारा, कर्जत लोकल पकडण्यासाठी थोडी धावपळ करावी लागणार आहे. तसेच सीएसएमटीवरून सुटणाऱ्या 22 जलद अप आणि डाऊन लोकल दादरवरून सोडण्यात येणार आहेत. परिणामी, सीएसएमटी, भायखळा येथील प्रवाशांचे हाल होणार आहेत.