
अमेझॉन प्राइम व्हिडीओच्या ‘फर्जी’ या आगामी वेबसीरिजच्या ट्रेलरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अवघ्या तीन आठवडय़ांत ट्रेलरला साडेतीन कोटींहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. ट्रेलरमध्ये शाहीद कपूर, विजय सेतुपती, के. के. मेनन अशा दिग्गज कलाकारांच्या मांदियाळीत एक मराठमोळा कलाकार भाव खाऊन जातोय, तो म्हणजेच अभिनेता नीलेश दिवेकर. या वेबसीरिजमधील त्याच्या दमदार भूमिकेची आणि बिअर्ड लूकची सर्वत्र चर्चा होत आहे.
‘द फॅमिली मॅन’ आणि ‘द फॅमिली मॅन 2’च्या तुफान यशानंतर दिग्दर्शक राज आणि डीके यांची फर्जी ही दुसरी वेबसीरिज आहे. आठ भागांची ही क्राईम थ्रिलर सीरिज 10 फेब्रुवारीपासून अमेझॉन प्राईम व्हिडीओवर झळकणार आहे. अष्टपैलू अभिनेता नीलेश दिवेकर या सीरिजमध्ये लक्षवेधी भूमिकेत आहे. याविषयी तो म्हणाला, मन्सूर (के. के. मेनन) हा बनावट नोटांच्या नेटवर्कमागील मुख्य सूत्रधार आहे. मी त्याच्या पार्टनरच्या अर्थात बिलालच्या भूमिकेत आहे. बनावट नोटांच्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस अधिकारी मायकल (विजय सेतुपती) त्यांच्या मागावर असतो. कशा प्रकारे बिलाल पोलिसांच्या जाळय़ात अडकतो…पुढे नेमके काय घडते हे सीरिजमध्ये पाहायला मिळेल. ‘फर्जी’मधील नीलेशचा बिअर्ड लूक लक्ष वेधून घेतोय. याबाबत तो म्हणाला, 2020 च्या सुरुवातीला मी सीरिजसाठी होकार दिला. भूमिकेसाठी दिग्दर्शकांनी मला दाढी वाढवण्यासाठी सांगितले. कोरोनामुळे शूटिंग पुढे ढकलत होते तसतशी माझी दाढीदेखील वाढत होती (हसत). शूटिंगपूर्वी जेव्हा मी दिग्दर्शकांना भेटलो तेव्हा माझा लूक पाहून दिग्दर्शक अचंबित झाले. वाह क्या लूक है, अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून मला मिळाली.
विजय सेतुपतीकडून कौतुकाची थाप
सीरिजमध्ये पोलिस अधिकारी बिलालला टॉर्चर करतानाचे एक दृश्य आहे. ट्रेलरमध्येही त्याची झलक दिसते. खरंतर तो माझा शूटिंगचा पहिलाच दिवस होता. नवीन भूमिकेत शिरताना आणि नवीन टीमसोबत काम करताना मी काहीसा नर्व्हस होतो. त्यातच माझ्यासमोर साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती होते. आम्ही रिहर्सल केली आणि पहिल्याच टेकमध्ये सीन ओके झाला. कॅमेरामन पंकज सरांनी टाळय़ा वाजवून आमचे कौतुक केले. त्यानंतर विजय सरांनी उभे राहून मला घट्ट मिठी मारली. ‘यू आर अ व्हेरी गुड ऍक्टर’ अशा शब्दांत माझे कौतुक केले, अशी आठवण नीलेशने सांगितली.