केंद्र सरकारची 1.70 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा

1108
nirmala-sitharam-pti

जीवघेण्या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉ़कडाऊनची घोषणा केली आहे. सगळ्या नागरिकांना घराबाहेर पडू नये असे निर्देश देण्यात आले असून फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकानेच या काळात सुरु राहणार आहेत. यामुळे महिला, कष्टकरी, शेतकरी यांना पुढचे 3 महिने आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं हे ओळखून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1.70 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. याचा फायदा विधवा, वृद्ध, दिव्यांगांनाही होणार आहे.

अर्थमंत्र्यांनी सगळ्यात पहिली घोषणा ही कोरोनाची झुंजणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी केली. त्यांनी रुग्णालयातले सफाई कर्मचारी, आशाताई, नर्स, डॉक्टर अशा सगळ्यांना 50 लाख रुपयांचे विमा कवच मिळेल अशी घोषणा केली. 20 लाख लोकांना याचा फायदा होईल असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

अर्थमंत्र्यांनी जी सगळ्यात मोठी घोषणा केली ती EPF संदर्भात. संघटीत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी घोषणा करत असताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की कर्मचारी आणि तो काम करत असलेल्या कंपनीचा हिस्सा असे मिळून एकूण 24 टक्के रक्कम सरकार भरेल. पुढच्या 3 महिन्यांसाठी ही मदत केली जाणार आहे. म्हणजेच पुढचे 3 महिने कर्मचाऱ्याच्या पगारातून पीएफची रक्कम कापली जाणार नाही. मात्र हा फायदा फक्त त्याच कर्मचाऱ्यांना मिळेल ज्यांच्या कंपनीमध्ये 100 पेक्षा कमी कमी कर्मचारी आहेत आणि तिथे 90 टक्के कर्मचाऱ्यांचा पगार हा 15 हजारापेक्षा कमी आहे. याशिवाय कर्मचारी पीएफ खात्यातून 75 टक्के रक्कम आगाऊ रक्कम किंवा 3 महिन्यांचा पगार यातील जी रक्कम कमी असेल ती काढू शकेल.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दोन प्रकार मदत केली जाणार आहे. पहिली मदत ही अन्नधान्याच्या स्वरुपातील असेल तर दुसरी मदत ही थेट रक्कम खात्यामध्ये जमा करण्याच्या स्वरुपात असेल असे निर्मला सीतारमण यांनी जाहीर केली. 80 कोटी गरीबांपैकी कोणीही अन्नाशिवाय राहू नये यासाठी गरिबी रेषेखालील कुटुंबातील व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त गहू किंवा तांदूळ आणि एक किलो डाळ मोफत देण्याचाही निर्णय आज जाहीर करण्यात आला. ही मदत पुढचे 3 महिने दिली जाणार आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशाच्या  8.69 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हजार रुपये जमा केले जाणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील पहिला हफ्ता म्हणून ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली जाणार आहे.  देशात मनरेगा योजनेचा लाभ 5 कोटी कुटुंबांना होतो. या योजनेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता दिवसाला 182 ऐवजी 202 रुपये मजुरी दिली जाणार असल्याचंही निर्मला सीतारमण यांनी सांगितले. 3 कोटी गरीब वृद्ध, दिव्यांग आणि गरीब विधवांना पुढचे 3 महिने 1000 रुपयांची रक्कम दोन टप्प्यात दिली जाईल असेही त्यांनी जाहीर केले.

देशातील 20 कोटी जनधन खातेधारक महिलांना पुढचे 3 महिने 500 रुपये, उज्ज्वला योजनेअंतर्गत 8.3 गरिबी रेषेखालील कुटुंबांना 3 महिने मोफत सिलिंडर, 63 लाख महिला बचत गटांना तारणाशिवाय 10 ऐवजी 20 लाखांचे कर्ज अशा घोषणाही अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्या

आपली प्रतिक्रिया द्या