मोठी बातमी! नितीश कुमार, हेमंत सोरेन आणि ममता बॅनर्जी 2024 लोकसभा निवडणूक एकत्र लढवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nitish-kumar-hemant-soren-mamata-banerjee

भाजपला सामोरे जाण्यासाठी विरोधीपक्षांच्या एकजुटीच्या चर्चेदरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घोषणा केली आहे की त्या नितीश कुमार, हेमंत सोरेन आणि इतर नेत्यांसह 2024 च्या निवडणुका एकत्र लढवतील.

‘आम्ही एकत्र येऊ. नितीश, अखिलेश, हेमंत, आम्ही सगळे तिथे आहोत. राजकारण हे रणांगण आहे. आम्ही 34 वर्षे लढलो आहोत’, असे त्या म्हणाल्या.

झारखंडच्या राजकीय घडामोडींचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या, ‘ते (भाजप) झारखंड विकत होते. आम्ही झारखंड वाचवले’.

गुरे तस्करी प्रकरणात टीएमसी नेते अनुब्रता मंडल यांना सीबीआयने अटक केल्याचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, ‘अनुब्रताला उचलले गेले. असे करून तुम्ही बीरभूमच्या दोन जागा जिंकाल असे वाटते? अनुब्रता बाहेर पडेपर्यंत बीरभूमचे नेते अनेक पटीने लढतील. अनुब्रत मंडल वीराप्रमाणे तुरुंगातून बाहेर येईल’.

‘त्यांना वाटते की मोठ्या नेत्यांना अटक केल्यास, कार्यकर्ते घाबरतील,’ असे त्या पुढे म्हणाल्या.

नवी दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यू येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाबाबत टिप्पणी करताना त्या म्हणाल्या, ‘एका सेक्रेटरींनी मला पत्र लिहिले की, पंतप्रधान संध्याकाळी 7 वाजता नेताजींच्या पुतळ्याचे उद्घाटन करतील आणि तुम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तिथे या’.

‘मी काही नोकर आहे का? सेक्रेटरी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहू शकतो का?, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

‘मी आता रेड रोड येथील नेताजींच्या पुतळ्याजवळ जाऊन आदरांजली वाहिली,’ असंही त्या म्हणाल्या.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा त्याच ठिकाणी स्थापित केला जात आहे जिथे त्यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण या वर्षाच्या सुरुवातीला पराक्रम दिवस, 23 जानेवारी (नेताजींच्या वाढदिवसाला) पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले होते. ग्रॅनाइटचा बनलेला हा पुतळा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील नेताजींच्या अतुलनीय योगदानाला श्रद्धांजली आहे.

28-फूट-उंच रचना असलेल्या एका मोनोलिथिक ग्रॅनाइट दगडातून ही मूर्ती कोरली गेली आहे आणि तिचे वजन सुमारे 65 मेट्रिक टन आहे.