केंद्राचा अध्यादेश घटनेच्या विरोधात, नितीशकुमार यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बदली, नियुक्त्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल कचर्‍याच्या पेटीत टाकून उपराज्यपालांना अधिकार बहाल करणारा केंद्राचा अध्यादेश घटनाविरोधी असल्याचा हल्लाबोल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केला आहे. या प्रश्नावर आम्ही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना नितीशकुमार यांनी बदली, नियुक्त्यांच्या संदर्भात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल डावलून काढलेल्या अध्यादेशावर जोरदार टीका केली. लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचे अधिकार अशा पद्धतीने कसे काढून घेतले जाऊ शकतात, असा सवालही नितीशकुमार यांनी केला. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल धाब्यावर बसवून काढलेला अध्यादेश घटनाविरोधी असल्याचे नितीशकुमार म्हणाले.

विरोधकांनी साथ देण्याचे केजरीवालांचे आवाहन
केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात आम्ही लढाई सुरू केली आहे. केंद्राने हा अध्यादेश संसदेत आणल्यावर विरोधकांनी त्याच्या विरोधात आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले. सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर राज्यसभेत नक्कीच केंद्राचा पराभव होऊ शकतो आणि असे झाले तर २०२४ मध्ये भाजप संपेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.