
‘कोरोना हा रोगच नाही आणि जी लोक कोरोनामुळे मरतात ते जगायला लायक नाही’, असं म्हणत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी (Sambhaji Bhide) यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. दारुची दुकानं उघडी आणि बाकी काही विकणाऱ्यांना पोलीस काठ्या मारतात. हा काय चावटपणा आहे, कोरोनामुळे संबंध देशातील लोकांमध्ये अस्वस्था आहे, असेही भिडे गुरुजी म्हणाले आहेत.
सांगलीत लॉकडाउनच्या विरोधात रस्त्यावर उतरून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. तसेच मास्क लावणे हा सगळा मूर्खपणा आहे. कोरोना हा ** वृत्तीच्या लोकांना होणारा मानसिक रोग आहे. तसेच मास्क लावल्याने कोरोना होत नाही हा शोध कुण्या शहाण्याने लावला आहे? असेही ते म्हणाले आहेत. दोन्ही सरकारवर टीका करत असल्याचे सांगतानाच ते म्हणाले की, कोरोनाच्या नावाखाली संपूर्ण देशात खेळखंडोबा सुरू आहे. कोरोनामुळे सगळी प्रजा भंपक आणि बावळट बनत चालली आहे. प्रत्येकाला जीवाची काळजी आहे, सरकारने यात लक्ष घालू नये. पारदर्शक कारभार करावा, अशीही भूमिका त्यांनी मांडली.
तर कोरोना वाढतच राहील!
कोरोना घालवण्यासाठी छत्रपती शिवरायांचा – छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श ठेवून राज्य केले पाहिजे. नोटेवरचे गांधी आदर्श मानून कारभार केल्यास हा कोरोना असाच वाढत राहील, असंही त्यांनी बोलताना नमूद केलं.




























































