
मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयात (सीएमओ) सर्वसामान्यांना दुपारी तीनपूर्वी प्रवेश बंद केला आहे. पण आता पत्रकारांनाही दुपारी तीनपूर्वी ‘नो एंट्री’चा फतवा मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केला आहे. त्यामुळे सरकारने माध्यमांचीही मुस्कटदाबी सुरू केल्याची मंत्रालयात चर्चा आहे.
मंत्रालयात खास करून मुख्यमंत्री कार्यालयात व्हिजिटर्सची गर्दी प्रचंड वाढू लागली आहे. त्यामुळे शासकीय कर्मचारी- अधिकारीही हैराण झाले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाची शिस्त बिघडल्यामुळे सर्वसामान्यांना मुख्यमंत्री कार्यालयात दुपारी तीनपूर्वी प्रवेश बंद करण्यात आला. आता मंत्रालयात व्हिजिटर्सना दुपारी दोननंतर प्रवेश दिला जातो. पण मुख्यमंत्री कार्यालयात तीननंतर प्रवेश दिला जातो.
मुख्यमंत्री कार्यालयातील प्रवेशावर निर्बंध आणल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालेले असताना आता माध्यमांच्या प्रतिनिधींनाही दुपारी तीनपूर्वी ‘सीएमओ’मध्ये प्रवेश नाकारण्यात येत आहे. त्यामुळे माध्यमांच्या प्रतिनिधींना धक्काच बसला. प्रवेशद्वारावरील पोलिसांकडे पत्रकारांनी विचारणा केली तेव्हा आपल्याला तसे आदेश आहेत असे पोलिसांनी उत्तर दिले. आतापर्यंतच्या राज्याच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींवर प्रवेशाचे बंधन घातलेले नव्हते, पण नव्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचे वेळेचे बंधन घातल्यामुळे माध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.



























































