मुंबईत दोन तासांसाठी ‘नो हॉर्न प्लीज’, वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ध्वनिप्रदूषणाला कारणीभूत ठरणारा आणि बऱ्याचदा विनाकारण वाजवल्या जाणाऱ्या हॉर्नचा आवाज शनिवारी संध्याकाळी दोन तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवायचा आहे. वाहतूक पोलिसांनी 5 ते 7 या वेळेत मुंबईमध्ये ‘नो हॉर्न’ हा विशेष ड्राइव्ह घेतला असून त्याची सर्वांनी अंमलबजावणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ध्वनिप्रदूषणाविरोधात जनजागृती करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी उद्या शनिवारी संध्याकाळी ‘नो हॉर्न’ ही विशेष मोहिम हाती घेतली आहे. संध्याकाळी 5 ते 7 या दोन तासांदरम्यान कोणीही हॉर्न वाजवायचा नाही, असे आवाहन मुंबईकरांना करण्यात आले आहे. या मोहिमेची अंमलबजावणी व्हावी यासाठी शहरात ठिकठिकाणी वाहतूक पोलीस तैनात ठेवण्यात येणार आहेत. शिवाय हॉर्न वाजवताना कोणी सापडला तर संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे वाहतूक पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. ‘नो हार्न’बाबत जनजागृती आणि त्याची अंमलबजावणी करण्याकरिता ही सुरुवात असल्याचे सांगण्यात आले.

त्या 100 ठिकाणी विशेष लक्ष

शहरात हॉर्नविरोधात विशेष मोहीम राबवली जाणार आहे. पण त्याचबरोबर शहरात सर्वाधिक आवाज होणारी 100 वाहतूक ठिकाणे पोलिसांनी शोधली आहेत. त्या 100 ठिकाणांवर शनिवारी नो हॉकिंग ही मोहीम कटाक्षाने राबवली जाणार आहे. त्या सर्व 100 ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात राहतील व हॉर्न न वाजविण्याबाबत जनजागृती करतील. तसेच त्या दोन तासांच्या कालावधीत विनंती करूनही कोणी हॉर्न वाजवताना सापडला तर संबंधितावर कारवाई केली जाईल, असे एका अधिकाऱयाने सांगितले. या 100 ठिकाणांव्यतिरिक्त अन्य ठिकाणांवरदेखील पोलिसांची नजर राहिल.
वाहतूक पोलिसांनी हॉर्नमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाविरोधात खास मोहीम हाती घेतली आहे. शनिवारपासून ‘नो हॉर्न’बाबत जनजागृती व अंमलबजावणीची आपण सुरुवात करत आहोत. पुढेदेखील ही मोहीम सुरूच राहील. जनतेकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
 राजतिलक रोशन, उपायुक्त (वाहतूक)