
सामना ऑनलाईन । पणजी
पर्यटकांचं लाडकं ठिकाण अशी ओळख असलेल्या गोव्यात आता नियम कडक झाले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटने दोन नियमांमध्ये बदल केला आहे. त्यानुसार, गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर अन्न शिजवणं आणि दारू पिणं या कृतींना मनाई करण्यात आली आहे. या दोन्ही निषिद्ध गोष्टींसाठी तुम्हाला 2 हजार ते 10 हजार रुपयांचा दंड किंवा तीन महिन्यांपर्यंत कैद होऊ शकते.
हा नियम गोवा सरकारने पर्यटन अधिनियमांतील नवीन तरतुदींतर्गत लागू केला आहे. या नियमाखेरीज गोव्यात हॉटेल बुकिंगचे नियमही बदलण्यात आले आहेत. पर्यटन मंत्रालयात नोंदणी न करता काही संस्था परस्पर हॉटेल बुकिंग करत होत्या, त्यामुळे यामध्ये काही गैरप्रकारही होऊ शकतात. हे रोखण्यासाठीच हे नियम बदलण्यात आल्याची माहिती गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी दिली आहे. काही पर्यटक आणि स्थानिक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पर्यटक सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन झाल्यानंतर बाटल्या तिथेच फोडतात. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांवर अस्वच्छता वाढतेच शिवाय फुटलेल्या काचांमुळे इजा होण्याचीही शक्यता असते. गोव्यातील कलंगुट, बागा, कंडोलिम, अंजुना आणि मोर्जिम अशा प्रसिद्ध किनाऱ्यांवर अशा तक्रारींचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.




























































