
सामना प्रतिनिधी । राहुरी
आकाश ढगाळ तसेच आर्द्रता वाढत असतांना पुढील ५ दिवसात पाऊस शुन्य असल्याचे कृषी सल्लागार समितीच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे. राहुरी कृषी विद्यापीठात हवामानावर आधारीत साप्ताहिक बैठक संपन्न झाली.६ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस पासुन ३३ अंश सेल्सिअसच्या पुढे वाढत जाणार आहे. आकाश ढगाळ तर वा-याचा ताशी वेग ८० किलोमिटर पर्यंत राहणार आहे.
या वातावरणात ऊसाला हुमणी अळीचा, कापसाला बोंडअळीचा, गव्हाच्या उगवण होत असलेल्या पिकाला लष्करी अळीचा, तूरीला शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव झाल्यास औषधाची फवारणी करण्याचा सल्ला शास्रज्ञांच्या वतीने देण्यात आला. सोमवारी राहुरी तालुक्यातील चिंचाळे, वरवंडी, मांजरी, धामोरी शिवारात पावसाने काही काळ हजेरी लावली होती.
आज बुधवार सकाळ पासुन वातावरणातील दमटपणा पाहता पाऊस येण्याचे अंदाज बांधले जात आहेत. माञ हवामानावर आधारीत असलेल्या मौसम विज्ञान विभागाच्या कृषी सल्लागार समितीच्या बैठकीत पाऊस गायब असल्याचे सांगितले आहे. वाढती आद्रता, ढगाळ वातावरण व पावसाचे आगमन हे समिकरण ओळखले जात असले तरी यंदा पावसाळ्याचे सर्वच नक्षञ कोरडे गेल्याने हे समिकरण मागे पडले आहे.






























































