
सामना ऑनलाईन, मुंबई
100 टक्के अनुदानासाठी राज्यातील विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी सरकारविरोधात सुरू केलेला लढा आता आणखी पेटला आहे. आझाद मैदानात ठाण मांडून बसलेल्या शिक्षकांनी आज मुंडण करून सरकारचा निषेध केला.
विनाअनुदानित शाळांचा अनुदानाचा प्रश्न गेल्या 18 वर्षांपासून प्रलंबित आहेत. वारंवार मागणी करूनही या शाळांना अनुदान लागू करण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे सोमवारपासून या शिक्षकांनी राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस असून शिक्षकांनी मुंडण करून सरकारचा निषेध केला.
पांडुरंग टकले, सुभाष मोरे, विजय कवर, सुभाष पाटील ज्ञानदेव शेळके या शिक्षकांनी मुंडण केले. आणखी काही शिक्षक मुंडण करण्याच्या तयारीत होते, मात्र आझाद मैदान पोलिसांनी हस्तक्षेप करून उर्वरित मुंडण रोखले, असे कृती समितीचे प्रशांत रेडीज यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांना शिक्षकांचे निवेदन
आंदोलनकर्त्या विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी मंगळवारी पत्रकार संघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना अनुदानाच्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी विनाअनुदानित शाळा संघटनेच्या वतीने प्रशांत रेडीज, खंडेराव जगदाळे, संजय डावरे, जितेंद्र डोंगरे आदी उपस्थित होते.































































