उत्तर मुंबईत कोरोना लढय़ाला जोर! फेरीवाले, दुकानदार, गर्दीच्या ठिकाणी अँटिजन चाचण्यांना वेग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

अंधेरी ते बोरिवलीपर्यंत कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत असल्याने पालिकेने ‘हॉटस्पॉट’ उत्तर मुंबईत कोरोना खबरदारीच्या उपाययोजना आणि नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. ‘आरटी–पीसीआर’ चाचण्यांसोबतच मॉल, फेरीवाले, वॉचमन आणि गर्दीच्या ठिकाणी अँटिजन चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. यामध्ये अंधेरीत पश्चिममध्ये एकाच दिवसात 250 कोरोनाबाधित आढळले असून कांदिवली, बोरिवली आणि दहिसरमध्ये 144 रुग्ण आढळले आहेत.

गेल्या महिनाभरापासून अंधेरी पूर्व-पश्चिमपासून बोरिवलीपर्यंत दररोज रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे सतर्क झालेल्या पालिकेने या भागात चाचण्या वाढवून जास्तीत जास्त रुग्ण शोधून आवश्यक कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आर/दक्षिण कांदिवलीमध्ये एकाच दिवसात केलेल्या 825 चाचण्यांमध्ये 56, आर/मध्य बोरिवलीत 904 चाचण्यांमध्ये 38 तर आर/उत्तर दहिसरमध्ये केलेल्या 816 चाचण्यांमध्ये 56 कोरोनाबाधित आढळले आहेत. यामुळे झोन-7 मध्ये येणाऱया कांदिवली, बोरिवलीत कोरोना खबरदारीच्या उपाययोजना वेगाने करण्यात येत असल्याचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी सांगितले. अंधेरी पश्चिममध्ये 250 हून अधिक रुग्ण एकाच दिवसात आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून आवश्यक त्या सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी सांगितले. जुहू चौपाटीवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी कठोर निर्बंध घालून कार्यवाही सुरू केली असल्याची माहितीही मोटे यांनी दिली.

चाचणीला नकार दिल्यास प्रवेश नाही

  •  ‘झोन-7’मधील बोरिवलीतीत इंद्रप्रस्थ मॉल, मोक्ष मॉल, मेट्रो मॉल आणि दहिसरच्या डी मार्ट, कांदिवलीचे ग्रोवेल्स मॉलच्या ठिकाणी अँटिजन चाचण्या करण्यात येत आहेत. या ठिकाणी अँटिजन चाचणीला नकार दिल्यास त्यांना प्रवेश न देता परत पाठवण्यात येत आहे.
  • दरम्यान, खासगी कार्यालयांमध्येही कर्मचाऱयांची उपस्थिती 50 टक्केच ठेवावी असे निर्देश देण्यात आले असून यावर पालिकेच्या प्रत्येक प्रभागातील 5 पथकांकडून नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्येचे प्रभाग

  • अंधेरी पश्चिम 2601
  • बोरिवली   1742
  • कांदिवली 1558
  • अंधेरी पूर्व 1931
  • मालाड 1457

विनामास्क कारवाईला जोर

‘झोन-7’मध्ये विनामास्कवाल्यांविरोधात धडक कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये जिमखाना, रेस्टॉरंट, सिनेमा हॉल, क्लब, गर्दीची ठिकाणे, मैदान–उद्याने, शॉपिंग मॉल–कॉम्प्लेक्स आणि खासगी कार्यालयांतही मास्क न वापरणाऱयांविरोधात धडक कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये एकाच दिवसात 2177 जणांवर कारवाई करून 4 लाख 35 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.