काँग्रेसच्या हाताला उमेदवारांची पाठ, विधानसभेत होणार भुईसपाट?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एस. एन. सिंह । मुंबई

सध्या देशात काँग्रेस पक्षाची हालत नाजूक झाल्याची दिसून येत आहे. राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर अद्याप नव्या अध्यक्षांची निवड झाली नसल्याने टीका होत असतानाच आता निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार देखील मिळत नाही अशी अवस्था झाली आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या अतिभव्य विजयानंतर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्ष बदल करण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकांच्या तिकिटासाठी मुंबईमध्ये बुधवारी काँग्रेस नेत्यांच्या मुलाखती ठेवण्यात आल्या होत्या. मात्र या मुलाखतीसाठी कुणीही फिरकलेच नाही. त्यावरून आगामी निवडणुकीत काँग्रेसची काय अवस्था होऊ शकते याचे अंदाज बांधले जात आहेत.

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेसने देखील माजी, विद्यमान आमदार तसेच इच्छुक उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित केल्या आहेत. यापैकी एका मुलाखतीचे आयोजन बुधवारी मुंबईमध्ये करण्यात आले होते. या मुलाखतीसाठी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे आणि हर्षवर्धन पाटील यांना पक्षाद्वारे नियुक्त करण्यात आले होते. प्रत्यक्षात मुलाखतीवेळी मात्र काँग्रेसच्या एकाही माजी, विद्यमान किंवा इच्छुक नेत्यांनी हजेरी लावली नाही. त्यामुळे मुंबईत काँग्रेसचे जहाज डुबण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाच्या झालेल्या मोठ्या पराभवामुळे आणि अनेक काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश केल्याने अन्य काँग्रेस नेत्यांमध्ये निराशा पसरली आहे. तिकिटांच्या मुलाखतींसाठी वर्षा गायकवाड, अमीन पटेल, असलम शेख, कृपाशंकर सिंह अशा अनेक पूर्व आणि विद्यमान नेत्यांनी हजेरीदेखिल लावली नाही. आमदार अमीन पटेल यांनी विदेशात असल्याकारणाने मुलाखतींना गैरहजर राहिल्याचे सांगितले. तर आमदार असलम शेख यांची पक्षाला रामराम बोलण्याची तयारी चालू असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. तिकिटांच्या मुलाखतीसाठी नेत्यांची मोठ्या प्रमाणावर गैरहजेरी लागल्याने काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस पक्षात सध्या पक्ष बदलाचे वारे वाहत असल्याने पक्षाचा सूपडा साफ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि याच कारणामुळे विधानसभा निवडणुकांच्या तिकिटांसाठी नेत्यांमध्ये उत्साह दिसत नाही आहे.