
सामना ऑनलाईन | नवी दिल्ली
देशातले प्रदूषण कमी व्हावे म्हणून आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने कंबर कसली आहे.येत्या काही महिन्यांत दिल्ली ते मुंबई असा प्रवास बसेस आणि मालट्रक चक्क विजेवर करताना दिसणार आहेत. मुंबई दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर रेल्वेच्या धर्तीवर विजेच्या तारा टाकण्याचा विचार रस्ते वाहतूक मंत्रालय करीत असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्र नितीन गडकरी यांनी दिली.
नव्या दिल्ली- मुंबई राष्ट्रीय महामार्गावर उच्च दाबाच्या वीजतारा टाकण्याचे काम लवकरच प्रायोगिक तत्वावर सुरु होणार आहे. या तारांच्या मदतीने प्रवासी बसेस आणि मालवाहतूक करणारे ट्रक विजेवर दिल्ली ते मुंबई प्रवास रस्तेमार्गे करताना दिसतील.हा प्रयोग यशस्वी झाल्यास देशातील अन्य शहरेही अशा वीजतारांनी जोडण्यात येतील असेही गडकरी यांनी सांगितले. ते म्हणाले, विजेवर बस आणि ट्रक चालवल्यास इंधनखर्च कमी होऊन देशातील प्रदूषणही कमी होईल .मात्र व्यावहारिकदृष्टया विजेवर चालणाऱ्या बस आणि ट्रकची वाहतूक यशस्वी होते का?. याचा अभ्यास वाहतूक मंत्रालय करीत आहे.
नव्या महामार्गाच्या दोन्ही बाजूला वीजतारा
नव्या दिल्ली -मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्हीबाजूला वीजवाहक तारा बसविण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे .त्यामुळे ट्रक्ससोबत बसेसही विजेवर दिल्ली-मुंबई अशी वाहतूक करू शकतील. अशा बसेस एकाला एक जोडलेल्या असतील. त्यामुळे प्रवासी वाहतूकही मोठ्या प्रमाणात आणि किफायतशीर होईल. माल ट्रकसचीही वाहतूक क्षमता २० ते २४ टक्क्यांनी वाढेल असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. नवा दिल्ली -मुंबई एक्सप्रेसवे दिल्लीहून जयपूर , अलवार ,सवाईमाधोपूर आणि वडोदरा या शहरांतून मुंबईला येईल असेही ते म्हणाले.


























































