
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम पूर्ण करणाऱया विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी थेट प्रवेश मिळणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमानुसार विद्यार्थ्याने किमान 7.5 सरासरी श्रेणी अंकासह (सीजीपीए) चार वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम पूर्ण केल्यास अशा विद्यार्थ्यांना मास्टर्स पदवीशिवायच पीएचडीसाठी प्रवेश घेता येईल.
यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी पीएचडी प्रवेशासंबंधी ही महत्त्वाची घोषणा केली. चार वर्षे पदवीपूर्व अभ्यासक्रमाचे विद्यार्थी थेट पीएचडी प्रवेशासाठी पात्र असतील असे त्यांनी सांगितले. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे सीजीपीए 7.5 पेक्षा कमी आहेत अशा विद्यार्थ्यांना पीएचडी प्रवेशासाठी एक वर्ष कालावधीचा मास्टर्स पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. आरक्षित प्रवर्ग आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना पीएचडी प्रवेशात 0.5 सीजीपीएची सूट देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षांची ऑनर्स पदवी की चार वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम राबवायचा याचा निर्णय हा विद्यापीठांनी घ्यायचा आहे, असेही जगदीशकुमार म्हणाले. तसेच चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्णतः अमलात येईपर्यंत पारंपरिक तीन वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम बंद होणार नाही, असेही ते म्हणाले.
पदवी अभ्यासक्रमासाठी सात वर्षांची मुदत
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार चार वर्षे पदवीपूर्व अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना ‘मल्टिपल एण्ट्री, मल्टिपल एक्झिट’चा पर्याय उपलब्ध होणार आहे, मात्र त्यासाठी कालावधीचे बंधन घालण्यात आले आहे. विद्यार्थ्याने तीन वर्षांच्या आधी अभ्यासक्रम सोडल्यास पुढील तीन वर्षांत त्याला पुन्हा प्रवेश घेता येईल. तसेच सात वर्षांमध्ये पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे.



























































