
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
जवळपास सर्वच रेल्वे गाडय़ांमध्ये बायोटॉयलेट लावल्यानंतर अद्ययावत व्हॅक्युम बायोटॉयलेट लावण्याची तयारी रेल्वेने सुरू केली आहे. विमान कंपन्याप्रमाणे रेल्वेच्या प्रवाशांनाही चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी रेल्वे प्रयत्नशील आहे. व्हॅक्युम बायोटॉयलेट हा त्याचाच भाग असल्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.
सुरुवातीच्या टप्प्यात रेल्वे गाड्य़ांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर व्हॅक्युम बायोटॉयलेटस् बसवले जातील. सुमारे ५०० व्हॅक्युम बायो टॉयलेटस्ची ऑर्डर देण्यात आलेली आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर सध्या रेल्वे गाडय़ांमध्ये असलेली अडीच लाख बायोटॉयलेटस् बदलून त्याजागी अद्ययावत टॉयलेटस् बसवली जातील. या कामासाठीचा खर्च करण्याची सरकारची तयारी असल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले.
मार्च २०१९ पर्यंत १०० टक्के रेल्वे गाडय़ांमध्ये बायोटॉयलेटस् बसवण्याचे काम पूर्ण होईल. याशिवाय रेल्वेचे ट्रक स्वच्छ होतील. दुर्गंधी पसरणार नाही. काही ठिकाणच्या रेल्वे ट्रकचे नूतनीकरणही केले जाईल.
– व्हॅक्युम बायोटॉयलेटस्मध्ये पाण्याचा वापर पाच टक्के कमी होईल. अडीच लाख रुपये खर्चून तयार होणाऱया व्हॅक्युम बायोटॉयलेटस्मुळे दुर्गंधी पसरणार नाही.
– ३१ मेपर्यंत ३७,४११ डब्यांमध्ये एक लाख ३६ हजार ९६५ बायोटॉयलेटस् बसवले जातील.
– प्रत्येक टॉयलेटवर साधारणपणे एक लाख रुपये खर्च येईल, असा अंदाज आहे.
– मार्च २०१९ पर्यंत आणखी १८,७५० डब्यांमध्ये बायोटॉयलेटस् दिसतील.
– सर्व व्हॅक्युम बायोटॉयलेटस्वर तब्बल २५० कोटी रुपये खर्च येईल, अशा अंदाज आहे.




























































