न्यूड व्हिडीओ कॉल करून उकळायचे खंडणी, 200 जणांना गंडा घालणारी टोळी ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यूड व्हिडीओ कॉल करून खंडणी वसुलीचं रॅकेट चालवणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने देशभरात खंडणी वसुलीचं थैमान घातलं असून दिल्ली/एनसीआर, पंजाब, हरयाणा आणि दक्षिण हिंदुस्थानातील अनेक राज्यांमधील 200 जणांना आतापर्यंत गंडा घातला आहे.

या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मेवात येथील दोन जणांना राजस्थानहून अटक केली आहे. दोघांवरही सेक्सटॉर्शन रॅकेट चालवल्याचा आरोप आहे. या टोळीने अनेकांकडून न्यूड व्हिडीओ कॉल करून खंडणी वसूल केली आहे. यात अनेक राज्यांमधील व्यापाऱ्यांचा समावेश आहे. ही रक्कम जमा करण्यासाठी 14 बँक खात्यांचा वापर करण्यात आला आहे. नुकतीच या खात्यांमध्ये 22 लाख इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे.

या दोन्ही आरोपींची नावं समयदीन आणि मुनफेद अशी आहेत. अटक केल्यानंतर त्यांच्याकडून त्यांच्या गुन्ह्याच्या प्रक्रियेची कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी या रॅकेटच्या कामाची माहिती दिली. हे दोघेही आधी 45 ते 60 वर्षं या वयोगटातील पुरुषांना हेरायचे. असे पुरुष, ज्यांची सोशल मीडियावर अकाउंट्स असतील, अशांना प्राधान्य दिलं जात होतं. अशा पुरुषांना महिलांच्या नावाने फेक प्रोफाईल बनवून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जायची. त्यानंतर सोशल मीडियावरच बोलणं होत असे. काही काळाने फोन नंबर शेअर करून सेक्स्टिंग सुरू केलं जायचं. एक दिवस या टोळीची महिला सदस्य व्हिडीओ कॉल करत असे. त्या व्हिडीओ कॉलवर विवस्त्र होत आणि समोरच्या माणसालाही व्हायला सांगत. समोरच्या माणसाने कपडे काढल्यानंतर हा कॉल रेकॉर्ड केला जात असे. त्यामुळे त्यांना या कॉलच्या आधारे ब्लॅकमेल करता येत असे.

काही तक्रारदारांनी सांगितल्यानुसार, व्हिडीओ कॉलवर जेव्हा शिकार जाळ्यात अडकत नसे, तेव्हा फोटो मॉर्फ करून त्याआधारे ब्लॅकमेल करण्यात येत असे. पैसे न दिल्यास व्हिडीओ प्रसिद्ध करण्याची धमकी दिली जात असे. त्या आधारावर पैसे उकळले जात होते. या टोळीत अन्यही काही जण असून त्यांना अद्याप अटक झालेली नाही. तर याच टोळीचा अजून एक सदस्य असलेल्या नखरुद्दीन नावाच्या आरोपीला पोलिसांनी गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात अटक केली होती.