13 ऑगस्ट रोजी नूहमध्ये महापंचायतीचे आयोजन, आजूबाजूच्या जिल्ह्यांतही निमंत्रणे पाठवली

हरयाणातील नूहमध्ये काही दिवसांपूर्वी हिंदू आणि मुसलमानांमध्ये जबरदस्त हिंसाचार उफाळून आला होता. इथली परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी इथे कधीही हिंसाचार उसळू शकतो अशी दहशत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात घर करून आहे. नूहमध्ये 13 ऑगस्टला जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एका महापंचायतीचे आयोजन केलं. त्यासाठी तयारी सुरू असून हिंदू समाज मेवातच्या वतीने नूह, फरीदाबाद , पलवल , गुरुग्राम इत्यादी गावातील लोकांना निमंत्रणे धाडण्यात आली आहेत. मुस्लिमबहुल नूह जिल्ह्यात 31 जुलै रोजी विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) ब्रज मंडल शोभा यात्रेवर हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात दोन होमगार्ड आणि एका इमामासह सहा जण ठार झाले होते आणि 88 जखमी झाले होते. यानंतर गुरुग्राममध्येही हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या होत्या.

गोरक्षा दलाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलंय की, 7 ऑगस्ट रोजी हातीन , मेवात , सोहना , पलवल आदी गावांतील प्रमुख मंडळी एकत्र आली होती. त्यांनी नूह हिंसाचाराच्या संदर्भात 13 ऑगस्ट रोजी लघु सचिवालयाजवळ असलेल्या किरा गावातील गोशाळेत पंचायत आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे .यासंदर्भात मेवात गोरक्षा दलाचे अध्यक्ष बलजीत यांनी सांगितले की, यासाठी त्यांना जिल्हा प्रशासनाकडून परवानगी मिळाली आहे. मात्र , उपायुक्त धीरेंद्र खडगटा यांनी अशी कोणतीही पंचायत घेण्यास जिल्हा प्रशासनाने मान्यता दिलेली नाहीये असे सांगितले.

इंटरनेट बंदी 13 ऑगस्टपर्यंत वाढवली
नूह जिल्ह्यातील इंटरनेट सेवेवरील बंदी 13 ऑगस्टच्या रात्रीपर्यंत वाढवण्यात आली आहे . याअंतर्गत जिल्ह्यातील 2G , 3G , 4G , 5G CDMA , GPRS या मोबाईल इंटरनेट सेवा आणि सर्व एसएमएस सेवा (बल्क SRVMS आणि बँकिंग आणि मोबाईल रिचार्ज वगळता) बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .

ब्रिजमंडल यात्रेची तयारी जोरात
विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाने 28 ऑगस्टला पुन्हा एकदा नूह येथे जलाभिषेक यात्रा सुरू काढण्याची घोषणा केली आहे. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये हिंसाचार झाल्याने 31 जुलै रोजी ही यात्रा अर्धवट सोडून देण्यात आली होती . विहिंपचे केंद्रीय कोषाध्यक्ष रमेश गुप्ता यांनी सांगितले की, ब्रिजमंडल यात्रा पूर्ण होण्यासाठी फक्त दोन दिवस उरले आहेत. 21 किंवा 28 ऑगस्टला यात्रा होऊ शकते . 28 ऑगस्टला यात्रा पूर्ण करण्यासाठी संघटनेने परवानगी मागितली आहे. यासाठी संघटनेने हरियाणाच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे.