
सामना ऑनलाईन । कोलकाता
तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ यांचे पती निखील जैन यांची 45 हजारांची फसवणूक झाली आहे. व्हीआयपी नंबर देतो असं सांगून जैन यांच्याकडून पैसे घेण्यात आल्याचं जैन यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, निखिल यांना मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात एका टेलिकॉम कंपनीच्या अधिकाऱ्याच्या इमेलवरून व्हीआयपी नंबरसाठी विचारणा झाली होती. जर एखादा व्हीआयपी फोन नंबर किंवा विशिष्ट आकडे असलेला फोन नंबर असेल तर संपर्क साधण्याबाबत या मेलमध्ये नमूद करण्यात आलं होतं. या इमेलला उत्तर दिल्यानंतर एका बँक खात्यात 45 हजार रुपये जमा करण्याबाबत सांगण्यात आलं होतं. त्यानुसार जैन यांनी रक्कम जमा केली. मात्र, त्यांना नंबर मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच निखील यांनी कोलकाता पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार केली.
कोलकाता पोलिसांनी ते बँक खातं गुजरातमधील बडोद्यातील सुभानपुरा येथील बँकेत असल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचे अजून काही तपशील जैन यांच्याकडे मागितले असून त्या तपशीलांनुसार पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

























































