भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवा, ओबीसी एकीकरण समितीने दिला आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून तातडीने हटवण्यात यावे, अशी मागणी ओबीसी एकीकरण समितीने आज केली. तसेच त्यांना पदावरून जर हटवले नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.

उच्च न्यायालयाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे रामदास स्वामी हे गुरू नसल्याचे अधोरेखित केलेले आहे. असे असतानाही ‘रामदास स्वामी नसते तर शिवाजीला कोणी ओळखले असते’, असे विधान करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महानतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे काम राज्यपालांनी केले आहे. दुसरीकडे महिला शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना राज्यपालांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा अवमान करणारी विधाने केली आहेत. त्यामुळे बहुजनवर्गात संतापाची लाट उसळली आहे. याचा गांभीर्याने विचार करून राज्यपालांना त्यांच्या पदावरून तातडीने हटवण्यात यावे, असे निवेदन ओबीसी एकीकरण समितीने जिल्हाधिकाऱयांना दिले आहे. याप्रसंगी समितीचे निमंत्रक प्रफुल वाघोले, काँग्रेसचे सरचिटणीस सचिन शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर, राहुल पिंगळे, शेखर पाटील,  रवींद्र कोळी, अमित पाटील, पप्पू मोमीन,  विक्रम खामकर, सचिन साळवे, संजय भालेराव, नीलेश हातणकर, अभिषेक पुसाळकर आदी उपस्थित होते.