ओबीसी-मराठय़ांमध्ये कलह निर्माण करून दंगली घडविण्याचा फडणवीसांचा कट! जरांगे यांचा खळबळजनक आरोप

ओबीसी आणि मराठय़ांमध्ये कलह निर्माण करून राज्यात दंगली घडवून आणण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा कट असून सरकारमधील काही मंत्र्यांचीही त्याला साथ असल्याचा खळबळजनक आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. ओबीसींच्या खांद्यांवर बंदूक ठेवून मला बदनाम करण्यात येत आहे; पण तुम्ही कितीही आदळआपट करा, मराठय़ांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीच्या निमित्ताने आज नांदेडात मराठा महासागरच अवतरला होता. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. मराठा समाज आपल्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरला आहे. पण ओबीसी आणि मराठय़ांमध्ये भांडणे लावून राज्यभर दंगली घडवून आणण्याचा कट फडणवीसांनी रचला असून त्याला सरकारमधील काही मंत्री साथ देत आहेत. गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाने आणलेल्या दबावामुळे सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला, परंतु सगेसोयऱयांचे घोंगडे भिजत ठेवले, असे जरांगे म्हणाले.

आरक्षणाची लढाई शेवटच्या टप्प्यात आली असताना छगन भुजबळांना समोर करून ओबीसींचे आंदोलन सुरू करण्यात आले. ओबीसींच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भुजबळ जेलात जातील आणि सोबत तुम्हालाही घेऊन जातील, असा टोलाही मनोज जरांगे यांनी फडणवीस यांना लगावला.