स्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

स्थूलपणामुळे तुमचे आरोग्यच धोक्यात येत नाही तर तुमच्या कामकाजावरही त्याचा परिणाम होतो. यामुळे सामान्य व्यक्तींच्या तुलनेत स्थूल व्यक्तींना पगारही कमी मिळतो. असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

इंग्लडंमधील LinkedIn या संस्थेने इंग्लडमधील तब्बल 4000 नोकरदार महिला व पुरूषांचे सर्वेक्षण केले. यात स्थूल, स्थूलतेकडे कल असणारे आणि किरकोळ देहयष्टी असणाऱ्यांच्या आरोग्य समस्यां बरोबरच त्यांच्या पगारातही तफावत असल्याचे निदर्शनास आले. लठ्ठ व्यक्तींमध्ये कामाबद्दल कमी उत्सुकता असते. यामुळे कामात त्यांचा वेगही कमी असतो. त्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होतो. यामुळे त्यांची कमी कार्यक्षमता बघून कंपनी त्यांचे पगारही वाढवण्यास उत्सुक नसते. पण दुसरीकडे किरकोळ देहयष्टी असलेल्यांमध्ये चंचलपणा अधिक असल्याने त्यांची कार्यक्षमताही अधिक असते. यामुळे कंपनी त्यांच्या कामावर खुश होऊन त्यांचे पगार वाढवत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले. त्यातही स्थूल पुरूषांच्या तुलनेत स्थूल महिलांना कमी पगार मिळत असल्याचे समोर आले आहे.