
विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. येत्या 23 जानेवारीला शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या तैलचित्राचे अनावरण होईल, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांनी आज दिली.
विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांनी विधान भवनात पत्रकार परिषद आयोजित केली होती. या वेळी बोलताना ते म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राज्यातच नव्हे, तर देशात अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्त्व व नेतृत्व होते. त्यांच्या कार्याचा आणि राज्याला व देशाला त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून विधानसभेच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांचे तैलचित्र लावावे, अशी सर्वांच्या मनातील इच्छा होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मला याबाबतचे निवेदन दिले होते. त्या निवेदनाच्या आधारावर विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याची घोषणा मी अधिवेशनात केली होती. त्यानुसार शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी 23 जानेवारीला अत्यंत चांगला सोहळा करून त्यांच्या तैलचित्राचे संध्याकाळी सहा वाजता अनावरण करण्यात येईल, असे ते म्हणाले.
असा होईल कार्यक्रम
या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुखांवरील चित्रफीतही दाखवण्यात येईल, या कार्यक्रमासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे व ठाकरे कुटुंबीयांना आमंत्रण दिले आहे. तसेच केंद्रीय मंत्री, राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, सर्व आमदार, खासदार, क्रीडा, कला व चित्रपटसृष्टीतील मान्यवरांना आमंत्रण दिले असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.