
सामना प्रतिनिधी । ठाणे
आयुष्याच्या संध्याकाळी निराधार झालेल्या वृद्धांना आनंदाचे क्षण मिळावेत यासाठी कीर्ती संजीवन चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. निसर्गरम्य मामणोलीमध्ये सर्व सोयींनी युक्त वृद्धाश्रम साकारले असून तेथे आजी-आजोबांचा आपुलकीने सांभाळ केला जाणार आहे. शहरातील धकाधकीच्या वातावरणातून चार हात लांब असलेल्या मामणोलीमध्ये यानिमित्ताने वृद्धांना हक्काचे घर मिळाले आहे.
कीर्ती कॉलेजच्या आजी-माजी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी कीर्ती संजीवन चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली असून त्यांनी एकत्र येऊन निधी उभारला. तसेच काही दानशूर व्यक्तींची मदत घेऊन मामणोलीमध्ये 25 बेडचे वृद्धाश्रम तयार केले. ना नफा ना तोटा या तत्त्वावर हे वृद्धाश्रम चालवले जाणार आहे. विशेष म्हणजे नवनाथ शिंदे व मच्छिंद्र शिंदे यांनी वृद्धाश्रमासाठी आठ गुंठे जागा मोफत दिली आहे. तेथे आजी-आजोबांसाठी जेवण, चहा, नाश्ता याबरोबरच शेतमळा, बगीचा, पक्षी, मत्सालय या सुविधाही दिल्या आहेत.
आठवड्यातून एकदा वृद्धांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याचे विश्वस्तप्रमुख अविनाश मांजरेकर यांनी सांगितले. वृद्धाश्रमाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी कल्याणच्या महापौर विनिता राणे, मुंबईच्या उपमहापौर हेमांगी वरळीकर, जिल्हा परिषद सदस्या जयश्री सासे, सरपंच प्रीती राऊत, मनोज आरज, बांधकाम सभापती सुरेखा म्हात्रे, एसएनडीटी विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे, प्राचार्य सीमा सापळे, नील हेरणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
























































