शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारीत दाम्पत्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी । पिशोर

कन्नड तालुक्यातील निंभोरा येथे शेतीच्या जुन्या वादातून शनिवारी दोन गटांत कोयता व कुऱ्हाडीने झालेल्या हाणामारीत जखमी झालेल्या दाम्पत्याचा उपचारादरम्यान आज सोमवारी मृत्यू झाला. याबाबत परस्पर विरोधी तक्रारींविरुद्ध दोन्ही गटांच्या १२ जणांविरुद्ध पिशोर पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निंभोरा शिवारात गट नंबर ३६३ मधील जमिनीवरून महादू सांगळे व रामा घुगे यांच्या कुटुंबीयांचा जुना वाद असून तो न्यायप्रविष्ट आहे. शनिवारी दुपारी ही शेतजमीन नांगरण्यावरून दोन्ही गटांत शिवीगाळ सुरू झाली. त्यानंतर मिरची पूड, काठ्या, कुऱ्हाड व कोयता यांचा वापर झाला. यात मैनाबाई महादू सांगळे, महादू अहेलाजी सांगळे, समाधान महादू सांगळे, सोमीनाथ महादू सांगळे तसेच विरोधी गटाचे रामा भावडू घुगे, सुलाबाई रामा घुगे व गोविंद रामा घुगे हे सात जण जखमी झाले. दोघांनाही त्यांच्या नातेवाईकांनी पिशोर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यातील मैनाबाई व महादू सांगळे व त्यांची मुले समाधान व सोमीनाथ तसेच सुलाबाई व रामा घुगे, मुलगा गोविंद या जखमींना संभाजीनगरला घाटीत दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना आज सोमवारी सकाळी ८.३५ वाजेच्या सुमारास महादू अहेलाजी सांगळे व सायंकाळी ४.३० वाजता त्यांची पत्नी मैनाबाई सांगळे यांचा मृत्यू झाला. दोघांचेही घाटीत शवविच्छेदन करण्यात आले.

या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून बारा जणांविरुद्ध पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासाअंती खुनाचा तसेच इतर गुन्ह्यांचे कलम लावण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश पवार यांनी सांगितले.