राज्यात बीए व्हेरिएंटची संख्या वाढतीच, नागपूरमध्ये एकाच वेळी 20 रुग्ण, 17 जणांचे लसीकरण  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात गेल्या काही दिवसांत बीए व्हेरिएंटच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून नागपुरमध्ये एकाच वेळी या व्हेरिएंटचे 20 रुग्ण सापडल्यामुळे आतापर्यंत रुग्णांची संख्या 93 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे 20 रुग्णांपैकी 17 जणांचे लसीकरण झालेले आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी वेगाने पसरणाऱ्या बीए व्हेरिएंटची संख्या वाढत आहे. नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) च्या अहवालानुसार, नागपूर विभागात बीए-2.75 चे 20 रुग्ण सापडले. यात 11 पुुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. या रुग्णांचे नमुने 15 जून ते 5 जुलै दरम्यान घेण्यात आले होते. यात एक अल्पवयीन, 19 ते 25 वयोगटातील 9, 26 ते 50 वयोगटातील 6 आणि 50 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 4 जणांचा समावेश आहे. होम कोरेंटाईन केल्यानंतर हे सर्व जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात बीए-2.75 चे आतापर्यंत 30 रुग्ण सापडले असून राज्यात बीए व्हेरिएंट गटातील रुग्णांची संख्या 93 वर पोहोचली आहे.

राज्यात, मुंबईत रुग्णसंख्येत घट

राज्यात आज दिवसभरात 2 हजार 678 रुग्ण सापडले तर 8 जणांचा मृत्यू झाला. 3 हजार 238 जण कोरोनामुक्त झाले तर सक्रीय रुग्णांची संख्या 19 हजार 413 वर पोहोचली आहे. मुंबईत रुग्ण कमी झाले असून आज 540 रुग्ण सापडले तर दोघा जणांचा मृत्यू झाला. 540 पैकी 507 जणांना कोणतीही लक्षणे नाहीत. यातील 33 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर 8 जणांना ऑक्सिजन बेड देण्यात आला. दिवसभरात 1 हजार 263 जण कोरोनामुक्त झाले तर सक्रीय रुग्णांची संख्या पाच हजारांपेक्षाही कमी आली असून ती 4 हजार 875 वर पोहोचली आहे.