ओंकार नलावडेचा ऑलिम्पिक विजेत्यांना अनोखा सलाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. यावेळी भांडुप-कांजुर मधील ओंकार नलावडे या मराठमोळ्या युवकाने आपल्या अनोख्या कलेतून हिंदुस्थानच्या ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंच्या संस्मरणीय कामगिरीला खणखणीत सलाम केला आहे. याप्रसंगी शिवसेना कांजुर शाखेच्या वतीने ओंकार नलावडे याचा सरस्वती विद्यामंदिर येथे सत्कार करण्यात आला.

ओंकार नलावडे याने सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा, रौप्य पदक विजेती मीराबाई चानू, कास्य पदक विजेता बजरंग पुनिया व कास्य पदक विजेती पी. व्ही. सिंधू यांचे अनोखे इल्युजन पोट्रेट साकारले आहे. ओंकार नलावडे याने साडेपाच फुटी कागदी पुठ्ठय़ांचे चौकोनी आकाराचे खांब तयार केले. यामध्ये पुढच्या बाजूला दोन व मागील बाजूला दोन खेळाडूंचे पोट्रेट साकारले आहे. शिवसेनेकडून ओंकार नलावडेचा गौरव करण्यात आला आहे. याप्रसंगी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना अध्यक्ष बाबा कदम यांच्या हस्ते त्याला गौरवण्यात आले. यावेळी शिवसेना उपविभागप्रमुख अनंत पाताडे, शाखाप्रमुख रवींद्र महाडिक, माजी शाखाप्रमुख तानाजी मोरे, विजय तोडणकर, महिला संघटक सिद्धी जाधव, भारती शिंगटे, प्रकाश शिंदे, विकास नांदिवडेकर या मान्यवरांची उपस्थिती होती.