
सामना ऑनलाईन | महाड
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना सनई-चौघडा व नगारा वाजवून नित्यनियमाने मानवंदना देणाऱया रायगडातील चार कर्मचाऱयांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हा परिषदेतील सत्ताधारी शेकाप-राष्ट्रवादीचा सुलतानी कारभार याला जबाबदार असून गेल्या पाच महिन्यांपासून मानधनातील फुटकी कवडी देण्यात आलेली नाही. या गलथान कारभाराविरोधात शिवप्रेमींनी तीक्र संताप व्यक्त केला आहे.
जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी रायगडावर सनई-चौघडा आणि नगरा वादनाची परंपरा सुरू केली होती. जिल्हा परिषदेच्या पूजा निधीतून या कर्मचार्यांना मानधन देण्यात येते. पाचशे रुपयांपासून सुरुवात झालेले मानधन आता पाच हजारांवर गेले आहे. मानधनाची रक्कम रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत प्रत्येकाच्या खात्यावर जमा होते. परंतु पाच महिन्यांपासून मानधन दिले जात नसून त्या कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या महाड येथील बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून देखील दुर्लक्ष केले जात आहे.
सनई-चौघडा आणि नगारा वाजवणारे कर्मचारी नियमितपणे वादनाचे काम करीत नसल्याचे आढळून आले असून रायगडावर ठेवलेल्या हजेरी पत्रकावर महिन्यातून एकदा जाऊन सह्या करतात. त्यामुळे कर्मचाऱयांना शिस्त लागत नाही तो पर्यंत त्यांचे मानधन स्थगित करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला आहे. – सदानंद शिर्के, महाड उपअभियंता, बांधकाम विभाग.




























































