
सामना प्रतिनिधी । निलंगा
शहरातील मिलिंदनगर व बौद्धनगरच्या मध्यभागी भागातील वत्सलाबाई नरसिंग जाधव या अवैध दारू विक्रेतीच्या दारातच दारू पिऊन बाहेर पडत असताना किसन नागोराव वाघमारे या इसमाचा कोलमडून पडला व जागीच त्याचा मृत्यू झाल्याची विचित्र घटना घडली. संपूर्ण अवैध दारुविक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांच्या विरोधात जोपर्यंत कडक कारवाई केली जाणार नाही, तोपर्यत प्रेत ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी सरकारी दवाखान्यातच शेकडोच्या संख्येने ठिय्या मारला.
निलंगा शहरातील मिलिंद नगर बौद्ध नगर व पेठ या भागात बहुतांशी बौद्ध समाजाची मोठी वस्ती आहे. या भागामध्ये अवैध पद्धतीने दारू, हातभट्टी दारू विकण्याच्या व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. या भागातील ४ ते ५जण अवैध दारुविक्रीचा धंदा खुलेआम मोठ्या प्रमाणावर करतात, असा आरोप येथील रहिवाशांनी उप – जिल्हाधिकारी, निलंगा यांच्याकडे निवेदनाद्वारे केला आहे.































































