
सामना ऑनलाईन । उदयपूर
संसार म्हणजे तारेवरची कसरत हे प्रत्येकालाच माहीत आहे. एका व्यक्तीशी संसार करताना अनेकांची तारांबळ उडते. पण उदयपूरमधल्या एका पठ्ठ्याने तर चक्क तीन संसार एकाच वेळी पत्करले आहेत. आपल्या तीन लिव्ह इन जोडीदारांसोबत त्याने एकाच मांडवात लग्नगाठ बांधली आहे.
उदयपुरमध्ये सध्या त्याच लग्नाची जोरदार चर्चा चालू आहे. झाडोल तालुक्यात राहणारा नक्कालाल कसोटिया हा ३२ वर्षीय आदिवासी तरुण दिव्यांग आहे. नक्कालालनं एकाच मांडवात तिघींशी लग्न केलं. लग्नापूर्वी नक्कालाल या तिघींसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. नक्कालालच्या आयुष्यात आलेली पहिली लिव्ह इन पार्टनर ही त्याच्या पेक्षा १३ वर्षंनी मोठी आहे. तर त्याची दुसरी पार्टनर पुनकी हिच्यासोबत तो चक्क १२ वर्षं लिव्ह इनमध्ये राहिला. या दोन्ही महिलांपासून संतती न झाल्याने त्याने त्याची मेहुणी रेखा हिच्यासोबत लिव्ह इन नातं प्रस्थापित केलं आणि वर्षभरातच रेखा गर्भवती झाली.
नक्कालालला रेखा गर्भवती असल्याचं कळताच त्याला आनंद झाला. त्याने आप्तेष्टांच्या उपस्थितीत एकाच मांडवात तिघींशी लग्न केलं. या आदिवासी समूहात अनेक वर्ष लिव्ह इनमध्ये राहून लग्न करण्याची परंपरा आहे. त्यामुळे इतरत्र या विवाहाची चर्चा होत असली, तरी त्या समुदायात मात्र ही अतिशय सामान्य बाब मानली जाते.



























































