रिपब्लिक आणि वॉव चॅनेल बघण्यासाठी लाखो रुपयांचे वाटप; मुंबई पोलिसांनी टीआरपीचा बुरखा फाडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बनावट टीआरपी घोटाळा प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. रिपब्लिक भारत तसेच वॉव चॅनेलचा टीआरपी वाढविण्यासाठी नागरिकांचा खिसा गरम करण्याकरिता लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार करणारा मुख्य आरोपी अखेर पोलिसांकडे शरण आला. आशीष चौधरी असे आरोपीचे नाव असून त्याच्या अटकेमुळे या प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठे धागेदोरे लागले आहेत.

बनावट टीआरपी घोटाळ्यात झालेल्या पैशाच्या व्यवहारामध्ये आशीष चौधरी याची मुख्य भूमिका असल्याचे आरोपी अभिषेक कोलावडे याच्याकडून स्पष्ट झाल्यानंतर पोलीस आशीषचा शोध घेत होते. परंतु तो सापडत नव्हता. अखेर आशीष गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकासमोर हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक केली असून टीआरपी घोटाळ्यातील ही अकरावी अटक आहे. आशिष आणि अभिषेक यांना कोर्टात हजर केले असता दोघांनाही दोन नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर या गुन्ह्यातील अन्य आरोपी रामजी वर्मा आणि दिनेश विश्वकर्मा या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

पैसे दिल्याची फुलविक्रेत्या महिलेची कबुली
माझ्या घरात रिपब्लिक भारत चॅनेल लावण्यासाठी मला पैसे दिले होते, असे एका फुलविक्रेत्या महिलेने पोलिसांना सांगितले आहे. अभिषेकच्या माध्यमातून हे पैसे देण्यात आले होते. तर रिपब्लिक हा इंग्रजी चॅनेल घरात लावून ठेवण्यासाठी एका किराणावाल्याला विशाल भंडारी याने पैसे दिले होते, हे आधीच तपासात समोर आले होते.

  • आशीष व अभिषेक यांनी रोकड व्यतिरिक्त धनादेशचा झोल करुन पैसे मिळवले होते. लाखोंचे चेक हे दोघे कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वटवून घ्यायचे. मग त्यांच्याकडून ते पैसे घेऊन लोकांना वाटायचे.
  • अभिषेक आणि आशीष यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून लाखो रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. गेल्या ऑगस्ट महिन्यात दोघांमध्ये चार लाखाची अखेरची देवाणघेवाण झाली.
  • टीआरपी वाढविण्याकरिता आवश्यक असलेला पैसा आशिषकडे हवालामार्फत यायचा असा पोलिसांना संशय आहे.
  • हंसा रिसर्च आणि बार्पशी संबंधित 46 जणांचा या प्रकरणात आतापर्यंत जबाब नोंदविण्यात आला आहे.
  • अभिषेकची कंपंनी मॅक्स मीडिया आणि आशीष व्यवहार करत असलेल्या क्रिस्टल कंपनीमध्ये लाखोंचे व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

आशीष पुरवायचा अभिषेकला रोकड
ठाण्यात असलेल्या क्रिस्टल ब्रॉडकास्ट प्रा लि. या कंपनीत आशिषची पत्नी शर्मिष्ठा चौधरी आणि जय हरिष कोटक हे संचालक आहेत. परंतु आशिष हाच कंपनीचे सर्व व्यवहार बघायचा. शिवाय आर भारत आणि वॉव चॅनेलचा टीआरपी वाढविण्यासाठी आशीष प्रत्येक महिन्याला प्रत्येक चॅनेलसाठी अभिषेकला पाच लाख रुपये द्यायचा असे तपासात समोर आले आहे. मग अभिषेक हा रामजी आणि दिनेशच्या माध्यमातून नागरिकांना पैसे देऊन आर भारत व वॉव चॅनेल बघण्यास सांगायचे. आर भारत चॅनेल बघण्यासाठी ज्या नागरिकांना पैसे देण्यात आले होते. त्यांनी पैसे मिळाल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

महामुव्हीज चॅनेलच्या दोघा अधिकाऱयांची होणार चौकशी
बनावट टीआरपी घोटाळा प्रकरणात दिल्लीस्थित महामुव्हीज चॅनेलचा सहभाग समोर आला आहे. त्यामुळे या चॅनेलचे मार्केटिंग हेड अमित दवे आणि सीईओ संजीव वर्मा या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे.

क्रिस्टल कंपनी ही केबलला चॅनेल वितरण करण्याचे काम करते. शिवाय ही कंपनी न्यूज नेशन चॅनेलची ऑफिशियल डिस्ट्रिब्युटर आहे.