चारपैकी एका ग्राहकाची होतेय ऑनलाइन फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिंदुस्थानात डिजिटल सेवांचा लाभ घेण्याचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. परंतु, फसवणुकीचे प्रमाणही वाढत चालले आहे. चारपैकी एका ग्राहकाची ऑनलाईन सेवांच्या माध्यमातून फसवणूक होत असल्याचा निष्कर्ष एक्स्पिरिअन डिजिटल कंझ्युमर इनसाईट्सच्या अहवालात काढण्यात आला आहे. या कंपनीने आयडीसी या सल्लागार फर्मच्या सहकार्याने हा अहवाल तयार केला आहे.

हा अहवाल दहा एशिया पॅसिफिक बाजारपेठांमधील ग्राहक सर्वेक्षणांवर आधारित असून, त्यामध्ये ऑस्ट्रेलिया, चीन, हॉँगकाँग, हिंदुस्थान, इंडोनेशिया, जपान, न्यूझीलंड, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या बाजारपेठांचा समावेश आहे. ग्राहक खरेदी आणि उत्पादन विक्री ऑनलाईन मोबाईल फोनद्वारे करण्याचे सुलभ मार्ग शोधत असताना दुसऱया बाजूला ऑनलाइन फसवणुकीची शक्यताही वाढत आहे. अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे. डिजिटल फसवणुकींचा सामना करण्यासाठी याबाबत जागरूकता निर्माण होणे अधिक गरजेचे असल्याचे एक्स्पिरिअन क्रेडिट ब्युरोच्या व्यवस्थापकीय संचालक आणि एक्स्पिरिअन इंडियाच्या कंट्री हेड वैशाली कस्तुरे यांनी सांगितले.

वैयक्तिक डेटामध्ये आढळतात चुका

डेटा पुरविण्यात चुका होण्याचे प्रमाण थायलंडमध्ये सर्वाधिक (८५ टक्के) आहे. त्यापाठोपाठ व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि हिंदुस्थानचा क्रमांक लागतो. चुकीची माहिती सादर करण्यात सर्वात कमी प्रमाण जपानचे (२१ टक्के) आहे. तर हिंदुस्थानचे ७० टक्के प्रमाण आहे. ऑनलाईन व्यवहार करताना २४ टक्के हिंदुस्थानी ग्राहकांनी फसवणुकीचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे.