
एकतर्फी प्रेमातून प्रियकर वाट्टेल ती कृत्य करतात. याची किंमतही त्यांना चुकवावी लागते. असाच काहीसा प्रकार बंगळुरूहून लखिमपूर आलेल्या एका तरुणासोबत घडला. हा तरुण एकतर्फी प्रेमापोटी मुलीची भेट घेण्यासाठी बंगळुरूहून लखिमपूरला आला होता. तरुणीची तर भेट झाली नाहीच, मात्र कुटुंबियांनी आणि गल्लीतील लोकांनी मात्र त्याला चांगलाच चोप दिला. तसेच यानंतर त्याला पोलिसांच्याही हवाली दिले.
‘आज तक‘ने दिलेल्या वृत्तानुसार, देवरिया जिल्ह्यातील गौरीबाजार पोलीस स्थानक भागात असणाऱ्या पखरा गावचा रहिवासी सलमान अंसाही हा बंगळुरूमध्ये एसी मॅकेनिक म्हणून काम करतो. सात महिन्यांपूर्वी एका मोबाईल अॅपद्वारे सलमानची ओळख लखिमपूर खिरी जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणीशी झाली होती. दोघांमध्ये मेसेजची देवाण-घेवाण होत होती आणि फोनवरून संवादही साधला जात होता.
मुलगी आपल्याशी बोलतेय, मेसेज करतेय म्हणजे ती आपली गर्लफ्रेंडच झालीय असा समज सलमानचा झाला. यानंतर त्याने पुढचे पाऊल टाकत मुलीची भेट घेण्याचे ठरवले आणि मित्रसोबत दुकानात जाऊन एक टेडी बिअर, चॉकलेट आणि मिठाई गिफ्ट म्हणून घेऊनही आला. यानंतर हे गिफ्ट घेऊन तो बंगळुरूहून लखनऊला विमानाला आला.
तिथून लखिमपूरला आल्यावर त्याने मुलीच्या घराचा पत्ता मिळवला आणि तिच्या घरी पोहचला. मुलीने सलमानला पाहून आरडाओरडा सुरू केला. यामुळे आजूबाजूचे लोक आणि कुटुंबियही जमा झाले. लोकांनी सलमानची चांगलीच धुलाई केली आणि पोलिसांच्या हवाली केले.
पोलिसांना आरोपीकडून 1600 रुपये रोख आणि 11 जानेवारीचे विमान प्रवासाचे तिकीटही मिळाले. यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला सशर्त जामिन मंजूर केला.




























































