
गोवंश हत्या आणि गोवंश मांस तस्करीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या संगमनेर शहरात पुन्हा एकदा पोलिसांनी एक हजार किलो गोवंश मांस पकडले असून, सुमारे 8 लाख 50 हजार रुपये किमतीच्या वाहनांसह मुद्देमाल हस्तगत केला आहे. जोर्वे नाका परिसरात मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.
सलमान नजीर शेख (वय 20, रा. नाईकवाड पुरा, संगमनेर) याला अटक करण्यात आली असून, बुंदी उर्फ मुदस्सर करीम कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) हा पसार झाला आहे.
नाशिक-पुणे महामार्गावरील जोर्वे नाका परिसरात मध्यरात्री एक वाजेनंतर महिंद्रा झायलो व टाटा एस टेम्पोमध्ये जिवंत जनावरे डांबून ठेवून, तसेच कत्तल करून व मांस वाहतूक करताना मिळून आली. यावेळी पोलिसांचा छापा पडला असल्याची चाहूल लागताच बुंदी उर्फ मुदस्सर करीम कुरेशी हा त्याच्या ताब्यातील वाहन सोडून पळून गेला. त्याच्या वाहनातदेखील गोवंश मांस आढळून आले आहे. पोलिसांनी तब्बल 1000 किलो गोवंश मांस जप्त केले असून, वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारी वाहनेदेखील ताब्यात घेतली आहेत. यामध्ये टेम्पोत 600 किलो, तर झायलो कारमध्ये 400 किलो गोमांस आढळून आले आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सचिन दत्तात्रय आडबल यांनी फिर्याद दिली असून, संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस नाईक उगले तपास करीत आहेत.
























































