कांद्याचा वांदा संपण्यासाठी केंद्राकडून राज्यांना ‘बफर’ची ऑफर

ऐन सणासुदीला कांद्याने वांदा केला असून किरकोळ बाजारात कांदा 75 रुपये किलो यापेक्षा जास्त दराने विकला जात आहे. त्यामुळे आता कांद्याची भाववाढ नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली असून सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना कांद्याचा राखीव साठा (बफर स्टॉक) उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच किरकोळ बाजारातील कांद्याचे भाव खाली येतील, अशी आशा आहे.

उन्हाळी कांद्याचा साठा संपत चालला व नवीन पिक येण्यास विलंब लागणार असल्यामुळे देशात सर्वत्र कांद्याचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. यामुळे कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. मुंबईत किरकोळ बाजारात कांदा प्रति किलो 86 रुपये, चेन्नईत 83 रुपये आणि कोलकाता येथे 70 रुपये आणि दिल्ली येथे 55 रुपये दराने विकला जात आहे.
नाशिक येथील बफर स्टॉकमधून केंद्र सरकार कांदा 26 ते 28 रुपये किलो दराने पुरवठा करत आहे. याशिवाय देशभरातील घाऊक बाजारपेठांमध्ये नाफेडतर्फे कांदा उतरला जाणार असल्याचे नंदन यांनी सांगितले.

n किरकोळ बाजारातील कांद्याच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने आता हस्तक्षेप केला आहे. राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना राखीव साठय़ातील कांदा देण्यात येत असल्याची माहिती ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या सचिव लीना नंदन यांनी दिली. आसाम, आंध्रप्रदेश, बिहार, चंदीगढ, हरयाणा, तेलंगणा आणि तामीळनाडू या राज्यांनी पुढे येत 8 हजार टन कांदा बफर स्टॉकमधून घेतल्याची माहिती लीना नंदन यांनी दिली. तसेच अन्य राज्यांकडून प्रतिसादाची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या