
सोलापूरसह राज्यात कांद्याचे दर गडगडले असून, सरकारची नाफेडमार्फत कांदा खरेदीची घोषणा हवेतच विरली आहे. याचा फायदा शेजारील कर्नाटक राज्यातील बंगळुरू, कलबुर्गीसह जिल्हातील कांदा व्यापारी घेत आहेत. कर्नाटकात सोलापूरपेक्षा दर चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे सोलापूर बाजार समितीला फटका बसत आहे.
सोलापुरातील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. सोलापुरात दररोज 500हून अधिक गाडय़ांची आवक होते. सोलापूरसह पुणे, लातूर, धाराशिव, सातारा, विजापूरसह हजारो शेतकरी कांदा विक्रीसाठी येतात. देशातील व्यापारी खरेदीसाठी येतात. अशातच कांद्याचा दर गडगडल्याने सोलापूरच्या मार्केटला फटका बसत आहे. या गडगडलेल्या दराचा आणि नियोजनशून्यतेचा फायदा कर्नाटकातील व्यापारी घेत आहेत. सोलापूरहून अधिक भाव मिळत असून, आडत व वाहतूक खर्चातही कपात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जादा भावाची हमी देत कांदा पळविला जात आहे. सोलापुरात प्रतिकिलो 1 ते 4 रुपये दर दिला जात आहे. हा दर उत्पादन खर्चापेक्षाही अत्यंत कमी आहे.
यंदा कांद्याला शेजारील कलबुर्गी जिल्हात 25 ते 28 रुपये, तर बंगळुरू येथे याहून अधिक दर दिला जात आहे. सोलापुरातील गडगडलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी कर्नाटकातील दलाल, व्यापारी एजंट हे तळ ठोकून आहेत. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी नाफेडमार्फत कांदा खरेदीची घोषणा विधानसभेत केली, परंतु ती घोषणा सोलापुरात अद्यापही सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट पसरली आहे. सुलतानी राज्य कारभार व एजंटगिरीमुळे कांद्याच्या दराचा लाभ शेतकऱ्यांना न मिळता कर्नाटकातील व्यापाऱ्यांनाच अधिक मिळत आहे. दलाल व आडत व्यापाऱ्यांच्या संगनमतातून सोलापूरचा कांदा कर्नाटकात कमी दरात पळविला जात आहे.




























































