
फेसबुकवर मैत्री करून सरप्राइज गिफ्ट आणि नवीन घर घेण्यासाठी 5 हजार युरो पाठवत असल्याचे भासवून महिला शिक्षिकेला 4 लाख 60 हजार रुपयांना चुना लावल्याची घटना घडली आहे. फसवणूकप्रकरणी अंधेरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार महिला या शिक्षिका असून त्या अंधेरी परिसरात राहतात. गेल्या महिन्यात त्यांना फेसबुकवर डॉ. लॉरेन्स नावाची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. ती रिक्वेस्ट तक्रारदार यांनी स्वीकारली. त्यानंतर रिक्वेस्ट पाठवणाऱयाने तक्रारदाराचा मोबाईल नंबर घेतला. आपण लंडन येथे राहत असून व्यवसायाने डॉक्टर आहोत असे भासवले. त्याचदरम्यान महिलेला मोबाईलवर व्हॉटस्ऍप कॉल आला. सरप्राइज गिफ्ट आणि घर घेण्यासाठी 5 हजार युरो पाठवत असल्याचे भासवले. ते पार्सल थेट घरी येणार असून विमानतळावर जाण्याची गरज नसल्याचे त्याना सांगण्यात आले.
त्यानंतर तक्रारदारांना मोबाईल फोन आला. दिल्ली विमानतळावरून बोलत आहोत, तुमचे लंडन येथून डॉ. लॉरेन्स या नावाने पार्सल आले आहे. त्या पार्सलसाठी 25 हजार रुपये कस्टम डय़ुटी भरावी लागेल असे सांगून तक्रारदारांना पैसे भरण्यास भाग पाडले. पैसे भरल्यावर महिलेने डॉ. लॉरेन्सला पैशाबाबत विचारणा केली. तेव्हा लॉरेन्सने पैशाबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. पैसे भरल्यानंतर पुन्हा महिलेला एक फोन आला. दिल्ली विमानतळावरून बोलत आहे, डॉ. लॉरेन्स यांचे गिफ्ट आले असून त्यासाठी 85 हजार 900 रुपये भरावे लागतील असे त्याना सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून महिलेने पुन्हा पैसे भरले. कस्टम डय़ुटीच्या नावाखाली महिलेकडून सुमारे 4 लाख 60 हजार 900 रुपये उकळले. पैशासाठी पुन्हा फोन येऊ लागल्याने महिलेला संशय आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.


























































